सातारा : कृष्णा नदीच्या पुलावरून जुलै महिन्यात लहान मुलीसह उडी मारून आत्महत्या करणाऱ्या संचिता अक्षय साळुंखे (वय २४, रा.राऊतवाडी, ता.सातारा) या विवाहितेच्या आत्महत्येचे कारण पोलिस तपासात उघड झाले असून, तिच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहिता संचिता साळुंखे हिने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह २७ जुलै २०२४ रोजी वडुथ येथील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोनू शिंदे यांनी केला. या तपासामध्ये त्यांना परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांकडून काही माहिती मिळाली. विवाहिता संचिता साळुंखे हिने पतीचे अन्य एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज केला, तसेच दोन वर्षांची मुलगी अक्षिता ही वारंवार रडत होती. रात्री उशिरापर्यंत जागी राहिल्याने झोप येत नव्हती, त्यामुळे तिला मानसिक त्रास होत होता.
या त्रासाला कंटाळून विवाहिता संचिता हिने आपल्या मुलीसह आरळेकडे जाणाऱ्या पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. मुलगी अक्षिता साळुंखे हिला पाण्यात टाकून तिला जीवे मारून तिचा खून केला. त्यामुळे मयत संचिता साळुंखे हिच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फाैजदार काटकर हे अधिक तपास करीत आहेत.
