परळी : शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसमध्ये चढत असताना वाहकाने खाली ढकलल्याने भोंदवडेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी एसटी गावात आल्यावर वाहकाला जाब विचारण्यासाठी संबंधित बस अडवली. यामुळे वाहक व नागरिकांमध्ये तू-तू मैं-मैं झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. परळी खोर्यातील बहुतांश मुले शालेय शिक्षणासाठी सातारा येथे येत असतात.
मात्र, वाहकांकडून गाडीत चढत असताना पाठीमागच्या गाडीतून या, असे सांगून विद्यार्थ्यांना थांबवण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी तसेच प्रवाशांची तू …तू मैं..मै होत असते. शनिवारीही भोंदवडे येथील विद्यार्थ्यांला गाडीत बसू न दिल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी घरी फोन करून याची कल्पना दिली. यानंतर एसटी गाडी भोंदवडे येथे आल्यावर प्रवासी व पालकांनी संबंधित वाहकांना जाब विचारत वाहने अडवली, यामुळे एकच गोंधळ उडाला.
यावेळी पालक व नागरिकांनी वाहकाला मुलांना गाडीत का बसू देत नाही? अशी विचारणा केली. त्यावरून वाहन व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्यामुळे परिसरात चांगलीच गर्दी झाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित प्रकार लक्षात घेऊन पालक प्रवासी तसेच वाहक-चालकांची समजूत काढली. यानंतर दोन तासांनंतर बस मार्गस्थ झाली. दरम्यान, या परिसरात येणार्या गाड्यांमधील काही वाहक व चालक हे प्रवाशांची उद्धट बोलत असतात. तसेच हात दाखवूनही गाड्या थांबवत नाहीत. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे याबाबत वरिष्ठांनी संबंधित गैरवर्तन करणार्या वाहक तसेच चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
