पुणे : पुणे शहरातल्या गुन्हेगारांनी काही दिवस शांतीने घालविल्यानंतर पुन्हा खळखट्याकचा आवाज काढण्यास सुरूवात केली आहे. कोंढवा, वारजे, लोहगाव तसेच पर्वती भागात सलग वाहन तोडफोडीच्या घटना घडल्याने पुन्हा शहरात गुन्हेगारांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ, तसेच जुने वाद आणि तात्कालीक कारणावरून या घटना घडल्याचे समोर आले आहे. कोंढव्यात दोन गटात वाद झाले. वादानंतर एकाने हवेत गोळीबार देखील केला आणि वाहनांची तोडफोड करत दहशत देखील माजवली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अब्दुला उर्फ बकलब कुरोशी, ताहा नाईमुद्दीन शेख यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुला व त्याचे तीन मित्र कैसरबाग येथील एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांची एक मैत्रिण देखील आली होती. दरम्यान, यातील आरोपी अब्दुला व इतरांच्या ओळखीतील होते. त्यांनी अब्दुला याला मैत्रिणीला कशाला हॉटेलात बोलावले, अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. वादानंतर त्या आरोपीने त्याच्या साथीदारांना बोलावले. तसेच, गोंधळ घालत तलवार व पेवींग ब्लॉकने वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यांच्यात हाणामारी झाल्यानंतर अब्दुला कुरेशी याने कंबरेतील पिस्तूल बाहेर काढत हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या याप्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला. नागरिकांची धावपळ उडाली. परंतु, दहशतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. नंतर आरोपी पसार झाले.
रविवारी पहाटे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोकुळनगर भागात पहाटेच्या सुमारास टोळक्याने बारा ते पंधरा वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोकुळनगर परिसर समिश्र वस्तू व दाटीवाटीचा परिसर आहे. मध्यवर्गीय वस्ती असल्याने रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असता. दरम्यान, पहाटेच्या सुमारास अचानक गोंधळ करत आलेल्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. त्यात चारचाकी, तीनचाकी तसेच दुचाकींचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत पोलिसांकडे १२ ते १५ वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आलेली होती. मात्र, या टोळक्याने गोकुळनगरमधीलच तीन वेगवेगळ्या गल्यांमध्ये ही तोडफोड केल्याची माहिती आहे. तर वारजे माळवाडी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुर आहे. मात्र, पोलिसांना या टोळक्याचा थांगपत्ता लागेला नाही. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.
शनिवारी वैमनस्यातून लोहगाव भागात तिघांवर कोयत्याने वार करुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला, तसेच ८ दुचाकी, १ कार, रिक्षाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात संदीप नंदकुमार आढाव (वय ३५, रा. जाधवनगर, विश्रांतवाडी), सलीम बागवान आणि त्यांचा मुलगा अदियान जखमी झला. याबाबत आढाव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी निकेश पाटील (वय २१, रा. खंडोबानगर) याला अटक केली. त्याच्याबरोबर असलेले साथीदार अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहागव) आणि अल्पवयीनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील काही टोळक्याने वादविवादातून वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
