ढेबेवाडी : स्वयंपाकाच्या गॅस सिंलेडरचा अचानक स्फोट होऊन विंग ता.कराड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत घर जळून खाक झाले. रविवार दि. 22 रोजी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने कुटूंबीय वेळीच घराबाहेर पडल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सिंलेडर 25 फूट हवेत उडून फुटला आणि मोठा आवाज झाला. त्यानंतर घराने पेट घेतला. यात रोख रक्कमेसह सोने, संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे जळून मोठे नुकसान झाले आहे. एक तासानी आग आटोक्यात आणण्यात गावकर्यांना यश आले. अंदाजे सात लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, विंग पाणंद रस्त्यावर तानाजी कणसे यांचे घर आहे. सकाळी न्याहरी बनवण्याचे काम सुरू होते. स्वतः तानाजी कणसे, पत्नी सुरेखा, मुलगी रेणुका, मुलगा पीयुष, आई सुभद्रा हे कुटुंबिय घरातच होते. अचानक स्वयंपाक घरातून धूर येऊ लागला. ते पाहून भितीपोटी कुटूंबीयांनी घराबाहेर पळ काढला. त्यानंतर काही क्षणातच सिंलेडरचा स्फोट झाला. सिंलेडर साधारण 25 फूट उंच हवेत उडून मोठा आवाज झाला. सुदैवाने सर्वजण वेळीच घराबाहेर पडल्याने सर्वजण बचावले.
सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला लागलेली आग लागल्याने सुरवातीला घरातील व त्यानंतर रस्ता बांधकामावरील टँकरच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र तरीही आग आटोक्यात येत नव्हती. तब्बल एक तासांनी कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत घरातील संसारयोपगी साहित्य, सोन्याचे दागिने, धान्य, टीव्ही, फ्रीज पिठाची चक्की, कपडे, वगैरे संसारोपयोगी साहित्य व घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दरम्यान, गावकामगार तलाठी फिरोज अंबेकरी, क्लार्क संजय पाटील व अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. सात लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.
