दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. दीपिकाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. दीपिकाने सध्या अभिनय क्षेत्रापासून काहीसा ब्रेक घेतलाय. दीपिका आई झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी गायक दिलजीत दोसांझच्या म्यूझिक कॉन्सर्टमध्ये दिसली होती. आई झाल्यावर दीपिका कोणत्या सिनेमात काम करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. दीपिका रणबीर कपूरसोबत आगामी सिनेमात झळकणार आहे.
आई झाल्यावर दीपिकाचा पहिला सिनेमा
ई टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण संजय लीला भन्सालींंच्या आगामी ‘लव एँड वॉर’ सिनेमात खास भूमिकेत दिसणार आहे. दीपिकासोबत या सिनेमात बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका ओरीही झळकणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट प्रमुख भूमिकेत आहेत. दीपिका ‘लव अँड वॉर’मध्ये खास कॅमिओ करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका-रणबीर अनेक वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत.
पद्मावतनंतर दीपिका पुन्हा एकदा भन्सालींसोबत
‘लव एँड वॉर’ सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साली करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने बाजीराव मस्तानी, रामलीला, पद्मावतनंतर दीपिका पादुकोण पुन्हा एकदा संजय लीला भन्सालींसोबत एकत्र काम करणार आहे. ‘लव एँड वॉर’ सिनेमा २० मार्च २०२६ ला रिलीज होणार आहे. आलिया भट या सिनेमात कॅबरे डान्सरच्या भूमिकेत दिसणार असून रणबीर कपूर – विकी कौशल आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. दीपिकाने काहीच महिन्यांपूर्वी लेकीला जन्म दिला असून तिचं नाव दुआ असं ठेवलंय
