Explore

Search

April 19, 2025 8:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Crime : तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा

फसवणुकीचा आकडा कोटीत

कराड : तोतया आयपीएस अधिकाऱ्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील आणखी सोळा जणांची कोट्यवधींनी फसवणूक केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्याने अनेकांकडून लाखोंची रक्कम उकळली आहे. त्याच्या फसवणुकीचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

श्रीकांत विलास पवार (वय ३६, रा. श्रीपूर, माळशिरस, सध्या रा. कोयना वसाहत, ता. कराड), असे अटकेत असलेल्या त्या तोतयाचे नाव आहे. गुरुवारी त्याला पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

कराड शहर पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकारी श्रीकांत पवार याला बुधवारी ताब्यात घेतले होते. दोन वर्षांपूर्वी संशयित पवार हा जत परिसरात वास्तव्यास होता. त्यानंतर तो कऱ्हाडजवळील कोयना वसाहत परिसरात राहण्यास आला होता, अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. तोतया पवार याला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केल्याचे समजल्यानंतर जत परिसरातील १३ ते १४ युवकांनी कऱ्हाड शहर पोलिसांशी संपर्क साधून आपलीसुद्धा त्याने फसवणूक केल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे या फसवणुकीचा आकडा कोट्यवधीत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू आहे. त्याचबरोबर कराड तालुक्यातील आणखी तिघांची तोतया पवारने फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या माहितीचीही सत्यता पडताळली जात असून, या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे आता समोर आले आहे.

दरम्यान, संशयित पवारकडे कसून चौकशी सुरू असून त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या संशयिताला आणखी कोणी मदत केली आहे का? संशयिताचे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत आणखी साथीदार आहेत का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

महागड्या गाडीत अंबरदिवा

आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या श्रीकांत पवार याचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. तो महागडी कार वापरत असल्याचे तपासातून समोर आले आहे. गुरुवारी पोलिसांनी ती कार जप्त करून पंचनामा केला. त्यावेळी कारमध्ये अंबरदिवा, कायद्याची पुस्तके, पोलिसांची वर्दी यासह इतर साहित्य आढळून आले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy