पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान पदासह विविध पदांवर राहून त्यांनी दीर्घकाळ देशाची सेवा केली. दरम्यान ७ ऑगस्ट २०२३ ला ते संसदेत आले होते. तीच त्यांची संसदेतील शेवटची उपस्थिती ठरली. दिल्ली सेवा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू होती. या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्यासाठी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून संसदेत पोहोचले होते. या विधेयकाच्या विरुद्ध सरकारकडे बहुमत होते. मात्र, आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते संसदेत उपस्थित राहिले होते.
पंतप्रधान मोदींनी संसदेत केले होते कौतुक
मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून संसदेत आले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे भरभरून कौतुक केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “सरकार या मुद्द्यावर जिंकणार आहे हे त्यांना माहीत आहे. असे असतानाही ते व्हीलचेअरवर बसून संसदेत आले आणि त्यांनी मतदान केले. मला वाटते की एक खासदार आपल्या जबाबदारीबद्दल किती जागरूक असतो, याचे हे उदाहरण आहे आणि हे एक प्रेरणादायी दृश्य आहे. ते कोणाला ताकद देण्यासाठी मतदान करायला आले, हा प्रश्न नाही, ते देशाच्या लोकशाहीला ताकद देण्यासाठी इथे आले आहेत. मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो तसेच ते निरंतर आमचे मार्गदर्शन करत राहतील, अशी अपेक्षा करतो,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते.
