बारामती : महावितरण बारामती परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ६ लाख १९ हजार ९८३ ग्राहकांकडे ११२ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकी वसुलीची मोहीम सुटीच्या दिवशीही सुरु असून, थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांसह चालू बिलांचा भरणा त्वरित करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी बारामती, सातारा, सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (दि. ३०) दर्शवेळा अमावस्येनिमित्त स्थानिक सुट्टी असली तरी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवार, रविवार व सोमवार असे तिन्ही दिवस सुरु राहणार आहेत.
घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये बारामती मंडलात एकूण १ लाख ३७ हजार ४७७ ग्राहकांकडे २७ कोटी २७ लाख, सातारा जिल्ह्यात २ लाख ४ हजार १२१ ग्राहकांकडे २७ कोटी ५८ लाख, सोलापूर जिल्ह्यात २ लाख ७८ हजार ३८५ ग्राहकांकडे ५७ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावरच उपलब्ध आहे.
