कोल्हापूर : मोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक केल्याने कोल्हापुरातील एका वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला सात लाख रुपयांचा गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला. तर सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीच्या खात्यावरून तीन लाख रुपये लंपास केले आहेत. दोन्ही वेगवेगळ्या घटनांत सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली नाही, मात्र दोन दिवसांत देण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात लाख रुपये गेलेली संबधित व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर एक लिंक आली. यामध्ये काही माहिती असू शकते, या उद्देशाने त्यांनी ती पाहण्यासाठी खुली केली. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या बॅंकेतील वेगवेगळ्या खात्यांतून सात लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. अचानक झालेल्या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी संबधित आलेली लिंक आणि बँकेतील खात्याची माहिती सायबर यंत्रणेला दिली. त्यानंतर सायबरने त्यांची बॅंकेतील खाती गोठवली.
दुसऱ्या एका घटनेत सायबर गुन्हेगारांनी एका विद्यार्थिनीच्या खात्यावरून तीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील आहे. एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शुल्क भरण्यासाठी तिने खात्यावर रक्कम भरून ठेवली होती. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दोन दिवसांत तक्रार देणार आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापुरातील सायबर सेलकडूनही होत आहे. ऑनलाइन ॲपवर याबाबतची तक्रार आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
