मणिपूर : मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी धडक कारवाई करत सशस्त्र फुटीरतावाद्यांची चार बंकर उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाईत तिघांना ताब्यातही घेण्यात आल्यावे वृत्त PTIने दिले आहे.
शुक्रवारी (दि. २८) थमनापोकपी आणि सनासाबी गावात झालेल्या गाेळीबारात एक पोलीस कर्मचारी आणि एका महिलेसह चार जण जखमी झाले होते. थामनापोकपी आणि सनासाबी गावांच्या सीमेवरील डोंगराळ भागातून फुटीरवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्याची गंभीर दखल सुरक्षा दलांनी घेतली. गावांच्या सीमेवर असलेल्या डोंगराळ भागातील चार बंकर उद्ध्वस्त केली आहेत. तसेच तिघांना ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या वर्षी मे पासून मणिपूरमध्ये मेईटीस आणि कुकी-झो गटांमधील वांशिक हिंसाचारात 250 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच हजारो बेघर झाले आहेत. दरम्यान, लष्कर, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने कांगपोकपी जिल्ह्यातील उयोक चिंग येथे सशस्त्र फुटीरतावाद्यांवर कारवाई करत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
