पुण्यातील येरवडा चौकात गाडी थांबवून मद्यधुंद अवस्थेत अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा या विकृताला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गौरव आहुजा याने सिग्नलवरच लघुशंका केली होती. तसंच त्याला या कृत्याबाबत हटकणाऱ्या व्यक्तीसमोर त्याने अश्लील चाळेही केले होते. अखेर शनिवारी रात्री गौरवला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लवकरच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे.
पुण्यातील बड्या उद्योगपतीचा मुलगा असणाऱ्या गौरवने सार्वजनिक ठिकाणी दाखवलेली पैशांची मस्ती एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यानंतर याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जाऊ लागला. याची दखल घेत पुणे पोलीस गौरव आहुजावर कारवाई करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. अशातच त्याने शनिवारी सायंकाळी केलेल्या
कृत्याची माफी मागत आपण काही तासांत येरवडा पोलीस ठाण्यात हजर होऊ, असं सांगणारा व्हिडिओ रिलीज केला होता. मात्र तो पोलीस ठाण्यात हजर होण्या आधीच सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान, सातारा पोलिसांकडून आरोपी गौरव आहुजाला लवकरच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार असून त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी :
गौरव आहुजा याला फेब्रुवारी २०२१ मध्ये क्रिकेट बेटिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने गँगस्टर सचिन पोटेला याच्या टोळीवर कारवाई करत क्रिकेट बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बेटिंगच्या विळख्यात ओढण्यात आले होते. याच प्रकरणात गौरव आहुजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
