Explore

Search

April 5, 2025 12:57 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

“बरं झालं पक्ष फुटला…” – सुप्रिया सुळे

स्वत:च्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करु शकले नसते;                                             सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल.

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव न घेता म्हटले आहे की, जो माणूस स्वत:ची पत्नी, मुलांची आई असलेल्या महिलेच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही. मी आज याबाबत पहिल्यांदा बोलत आहे. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही. माझं घर कंत्राटाच्या पैशांवर चालत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे.  महादेव मुंडेंच्या पत्नीने मला विचारलं की, टया सगळ्यात माझ्या लेकरांची काय चूक होती?’ या प्रश्नावर मी काय उत्तर देणार? संतोष देशमुख यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्या आईने माझा हात धरला होता. आम्हाला न्याय देशील, असा शब्द दे सुप्रिया, असे त्यांनी म्हटले. मी त्यांना संतोष देशमुख यांना न्याय देण्याचा शब्द देऊन आले, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

महायुती सरकारच्या कारभारावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. “महायुती सरकारच्या 100 दिवसात एक विकेट गेली. आता सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार. त्याचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊन लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे डेंजर आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे.

धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पुढाकारामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे भक्कम पाठीराखे म्हणून ओळखले जात होते. शरद पवार यांच्याविरोधात अजितदादांनी पुकारलेल्या बंडातही धनंजय मुंडे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्यावरच आता सुप्रिया सुळे यांनी थेट हल्ला चढवल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर आता अजितदादा गटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy