जनता जाती वादी नाहिये, पुढारीच जाती वादी झालेत – भाजपा खासदार नितीन गडकरी
अमरावती ; अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल (22 मार्च) अमरावतीत केलंय. यांनी आपल्या भाषणात असे वक्तव्य करत जातीय व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. शिवाय नागपुरातील हिंसाचाराची घटना घडली असताना त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
माझं राजकारण माझ्या हिशोबाने चालेल, तुमच्या हिशोबाने नाही- नितीन गडकरी
या कार्यक्रमात पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, माझा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही. त्यांनी त्याच्या कर्तुत्वावर स्थान निर्माण करावे. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. आमदार खासदारांनी म्हणायच्या ऐवजी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जर म्हटलं तर त्यांना अधिकार आहे. जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना हा पूर्ण अधिकार आहे. कुणाचा मुलगा, मुलगी असणे गुन्हा नाही. आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण आहे. विकासकारण आहे. मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरी चालेल. जो मत देईल त्याचे काम करेल, जो नाही देईल त्याचेही काम करेल. त्यामुळे जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असेही नितीन गडकरी म्हणाले.
