पिस्तुले, दुचाकीसह 3 लाख 37 हजाराचा ऐवज जप्त
सातारा : कराड, ता. कराड येथील विद्यानगरमधील जयराम कॉलनी येथे सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्या पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तुले, दोन दुचाकीसह धारदार शस्त्रे असा 3 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
बबलू उर्फ विजय संजय जावेर, रा. शहापुर, ता. हातकणंगले, अनिकेत वसंत पाटणकर, रा. गोडोली, ता. सातारा, सुरज नानासो बुधावले, रा. विसापुर, ता. खटाव, राहुल अरुण मेमन, रा. केरळ, सध्या रा. विद्यानगर, कराड, ता. कराड, आकाश आनंदा मंडले, रा. खटाव, ता. खटाव अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समीर शेख म्हणाले, कराड ही सातारा जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ असून शहराची राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता सर्वच वरिष्ठ अधिकार्यांचे आपल्या शहरावर बारकाईने लक्ष असते. दि. 20 मे रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरांमध्ये गस्त घालत असताना विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली. संबंधितांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, दग्ििवजय सांडगे, संग्राम पाटील, महेश शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्या ठिकाणी वरील पाचजण आढळून आले. त्यांच्याकडे तीन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे, दोन दुचाकीसह धारदार शस्त्रे असा 3 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यातील बबलू उर्फ विजय जावेर याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरांवर हल्ला असे सहा गुन्हे दाखल आहेत. गोडोली येथील निकेट पाटणकर याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस अंमलदार विवेक गोवारकर, संजय देवकुळे शशिकांत काळे, अमित पवार, प्रवीण काटवटे, सचिन सूर्यवंशी, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, संग्राम पाटील, धीरज कोरडे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, संदीप शेडगे आदींनी सहभाग घेतला.
