अजितदादा पवार यांचे मुंबईच्या बैठकीत स्पष्ट निर्देश
सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यास राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे महायुतीच्या घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेत तसे ठरले आहे, याची थेट आठवण माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करून दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मुंबईत प्रथमच राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत दादांनी सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे याची आवर्जून आठवण करून देत सातारा जिल्ह्यालाच राज्यसभेच्या रिक्त जागेवर संधी दिली जाईल, असे अधोरेखित केले. नाहीतर विनाकारण त्या जागेसाठी आग्रह होऊ नये, याची काळजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी घ्यावयाची आहे, असे अजित दादा म्हणाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून कोणत्या कार्यकर्त्याची आगामी अडीच वर्षासाठी वर्णी लागणार आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे. संपूर्ण 40 मिनिटाच्या भाषणामध्ये अजितदादा पवार यांनी कार्यकर्ता हा पक्षाचा प्राण आहे आणि सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे त्यावर लक्ष ठेवले पाहिजे, असे सूचक विधान करत सातारा जिल्ह्यात मजबूत मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
अजितदादा पुढे म्हणाले, निवडणूक ही राजकीय कार्यकर्त्यांसाठी श्वास असते. मात्र सत्ता मिळवण्याचे ते एकमेव माध्यम नाही. कार्यकर्ता हा गेल्या पाच वर्षात सामान्य नागरिकांची कामे करत असतो आणि त्या कामाच्या जोरावर पक्षासाठी तो किती मते खेचून आणतो यावरून कार्यकर्त्याची ताकद दिसून येत असते. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे. नाहीतर आजकाल कोण कुणाला कधी सोडून जाईल याचा नेम नाही. बारामतीत आम्हाला असे आश्चर्यजनक अनुभव आले आहेत. कार्यकर्ता हा पक्षाचा प्राण आहे. त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. महायुतीच्या आघाडीत सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने अतिशय ताकतीने काम केले त्याबद्दल अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच यापुढेही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची मजबूत मोर्चे बांधणी कशी राहील तसेच महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षात राष्ट्रवादी पक्षाची मजबूत पकड आहे ती कायम ठेवण्याकरता कार्यकर्त्यांनी सतत आग्रही राहून क्रियाशील राहिले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना अजितदादा पवार यांनी दिल्या.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये 2019 मध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता. कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला त्या आधारावर कमी जागा आल्या होत्या. म्हणून आज मुंबईत सुरु असलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर मोठी मागणी केली आहे. लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात खटपट होता कामा नये. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असेही छगन भुजबळ म्हणाले.
यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. आपल्या पक्षाला मजबूत करायचं आहे. महायुतीत आपण आहोत त्यामुळे त्या महायुतीला देखील मजबूत करण्याचं आपलं काम आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेसारखी परिस्थिती होणार नाही, याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अधिकाधिक जागा आपल्या वाट्याला येतील, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
