सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत आहे. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सर्वच तालुक्यांत पाणी टंचाई आहे. त्यातच प्रमुख धरणांमध्ये अल्प पाणी शिल्लक आहे. गतवर्षी कोयना धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी कमी पावसामुळे प्रमुख धरणे पूर्ण भरलेली नाहीत.
यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतील पाणीपातळी खूपच कमी आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यासह सातारा तालुक्यासाठी उरमोडी धरण महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सर्वात भीषण स्थिती उरमोडी धरणातील झाली आहे. या धरणात केवळ ०.४३ टीएमसी पाणी आहे. एकूण क्षमतेच्या अवघे साडेचार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून ३९.४२ टीएमसी पाणी शिल्लक होते. आता धोम- बलकवडी धरण कोरडे पडले आहे. तारळी धरणातही पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणात २४.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणात निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना व कण्हेर धरणात पाणीसाठ्याची परिस्थिती बरी असून, कोयनेत १३.२४ टक्के तर कण्हेर १२.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रमुख धरणांतील तुलनात्मक आकडेवारी (टीएमसी)
धरण २०२३ २०२४ धरण २०२३ २०२४
- कोयना १३.४७ १३.२५
- धोम ३.२९ २.९०
- बलकवडी ०.७२ ०.००
- कण्हेर १.८५ १.२१
- उरमोडी ३.८४ ०.४३
- तारळी ३.१७ १.४५
Author: rayatdarpan
news



