फलटण : आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊ ठेपली आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांनाही पंढरपूराची आस लागली आहे. तुकाराम महाराज पालखीने सोलापूरचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान विविध गावांमधून येणाऱ्या दिंडीही ऊन-पाऊस विसरून विठ्ठलाचं नामस्मरण करीत पाऊल टाकत आहे. अशाच एक दिंडीत धक्कादायक प्रकार समोर आला.
दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली. त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात फलटण तालुक्यातील विडणी येथे बुधवार सकाळी साडेअकरा वाजता झाला. मोतीराम तुळशीराम तायडे (वय 78) असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.
विठ्ठलाचं नाव घेता घेता मृत्यू :
याबाबत अधिक माहिती अशी की, भानुदास तायडे (रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा) हे व त्यांचा चुलत भाऊ मोतीराम तायडे बुलढाण्यावरून आलेल्या दिंडीत सहभागी झाले. पालखी रथाच्या मागे लोकांसमवेत ते चालत निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या (एमएच 12 ईक्यू 5930) या ट्रकने मोतीलाल यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले. ट्रकच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली ते सापडले. अशा अवस्थेतही ट्रकचालकाने त्यांना 5 ते 7 फूट फरफटत नेले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
