ऊसतोड कामगार सातार्यात
सातारा : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आणि विधानसभा निवडणुकीची धामधूम एकाच वेळी सुरू आहे. या परिस्थितीमध्ये मराठवाडा -विदर्भातून जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीसाठी येणार्या मजुरांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. मतदान मराठवाडा, विदर्भात आणि ऊसतोड मजूर पोटासाठी कोयते घेऊन सातार्यात असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
गाळप हंगामासाठी मराठवाडा विदर्भ या भागातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. जिल्ह्यामध्ये सहकारी तसेच खाजगी तत्त्वावरील तब्बल 17 कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यांनी ऊसतोड मजुरांची टोळी मागून घेतली आहे. पुढील आठवड्यापासून गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता असल्याने मराठवाडा विदर्भातील मुकादमांनी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात पाठवून दिले आहेत. हे मजूर संपूर्ण कुटुंबकबिल्यासह जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. ट्रॅक्टर ट्रॉल्या ट्रक भरून हे मजूर सातार्यात येताना दिसत आहेत. सोबत त्यांची जनावरे देखील ते घेऊन येत आहेत. कारखान्याच्या परिसरामध्ये राहुट्या टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे.
लोकशाहीचा उत्सव एका बाजूला सुरू असताना हे मजूर आपल्या भागातून परक्या प्रदेशात दाखल होतात. त्यामुळे मतदानापासून त्यांना वंचित राहावे लागते.जिल्ह्यापासून बर्याच अंतरावर या कामगारांची गावे असल्यामुळे त्यांना मतदानासाठी न्यायचे म्हटले तर मोठा खर्च येणार असल्याने ऊस तोडणी मुकादम देखील त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. साहजिकच 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरू असताना हे शेतमजूर कुटुंबासह उसाच्या फळांमध्ये कोयता हाती घेऊन ऊस तोडताना पाहायला मिळतील. सुमारे लाखभराच्या घरात असलेल्या या ऊसतोड मजुरांना लोकशाहीच्या उत्सवापासून दूर राहावे लागणार आहे.
मतदारांना आपापल्या गावी जाऊन मतदान करायचे असते. ऊसतोडणी कामगार हे बीड, यवतमाळ, परभणी या भागातून सातारा जिल्ह्यात येत असले तरी त्यांना मतदानासाठी त्यांच्या गावीच जावे लागणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना पोस्टल बॅलेट मतदानाची सोय असते. मात्र, ऊसतोड कामगार हे गावी जाऊनच मतदान करतील. -भगवानराव कांबळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा
Author: rayatdarpan
news



