उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संगमनगर येथील 24 इंची पाईपलाईनला शुक्रवारी दुपारी एअर व्हॉल्व तुटून अचानक गळती लागली. सातारा-पंढरपूर मार्गाचे काम करणार्या ठेकेदाराच्या जेसीबी कडून जलवाहिनीचा व्हॉल्व तुटल्याने पाणी हवेत सुमारे 25 फूट उंच उडाले. अर्धा ते पाऊण तास हा पाण्याचा धबधबा सुरू होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने दुपारनंतर तातडीने दुरुस्ती मोहीम सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
त्यामुळे खेड ग्रामपंचायतीसह, संगमनगर, वनवासवाडी, शिवाजीनगर, राजगुरुनगर इत्यादी वसाहतींना शनिवारी पाणी मिळण्याची शक्यता दुरावली आहे. सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम मेघा इंजीनियरिंग या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. सुमारे तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी मेघा इंजिनिअरिंगच्या यंत्रणेमार्फत रस्त्याच्या साईड पट्ट्या तसेच इतर जुजबी कामांची पूर्तता सुरू होती. त्यावेळी मातीचा भराव जेसीबीच्या साह्याने उचलताना रस्त्याच्या कडेला असणार्या प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या एअर व्हॉल्वला जोरात दणका बसला. त्यामुळे अचानक जलवाहिनीला मोठी गळती लागली. संगमनगर येथील कच्छी स्टील मार्केटच्या समोर सुमारे 25 ते 30 फूट पाणी प्रचंड दाबाने आकाशाच्या दिशेने उडत होते. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले. सातारा-पंढरपूर महामार्गावर होणार्या वाहतुकीला पाण्याचे सचैल स्नान घडत होते.
सुमारे अर्धा ते पाऊण तास ही गळती सुरू होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे आणि उन्हाळ्यात सातारा शहर आणि उपनगरांमध्ये पाण्याची टंचाई सुरू असताना ठेकेदाराच्या बेजबाबदार कामाच्या पद्धतीमुळे पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रशासनिक अधिकारी अभियंता एस. एस. गडकरी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. सायंकाळी चार वाजता प्राधिकरणाच्या सहा कर्मचार्यांचे दुरुस्ती पथक तात्काळ तेथे रवाना झाले. माहुली येथील कृष्णा उद्भवाच्या उपसा केंद्रातून मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत एअर व्हॉल्व बसवण्याचे काम सुरू होते. माहुली ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक यादरम्यानच्या 24 इंची मुख्य जलवाहिनीवर खेड ग्रामपंचायत, शिवाजीनगर, ग्रामपंचायत वनवासवाडी, कृष्णानगर, संगम नगर, शिवाजीनगर, राजगुरुनगर, औद्योगिक वसाहत तसेच माहुलीच्या पूर्वेला असणार्या वसाहतीला पाणीपुरवठा होतो. शनिवारी व रविवारी कदाचित पाणी कमी दाबाने आल्यास नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
