सातारा : माती घेवून जाणार्या डंपर चालकाला व डंपर मालकाला सहा जणांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नेले येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दत्ता जाधव, अजय जाधव, शिवम जाधव, विशाल जाधव, अक्षय जाधव, अजिंक्य पाटील (सर्व रा.नेले ता.सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुरज मोहन गाडे (वय 32, रा.कोंडवे ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 16 मे रोजी नेले गावच्या हद्दीत घडली आहे. सुरज गाडे यांचा डंपर असून त्यावर साहील कांबळे हे चालक आहेत. चालक डंपरमधून मेढा ते वर्ये रस्त्यावरुन वीटभट्टीसाठी माती घेवून निघाले होते. त्यावेळी सहा जणांनी डंपर चालकाला डंपर थांबवायला लावून परत इकडे डंपर आणायचा नाही, असे म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावर चालकाने ठीक आहे, असे सांगितले. मात्र तरीही संशयितांपैकी काही जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे डंपर चालक घाबरला व स्वत:ची सुटका करुन घेतली.
नेले येथे झालेल्या मारहाणीबाबत साहील कांबळे यांनी डंपर मालक तक्रारदार सुरज गाडे यांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे गाडे हे स्वत: नेले येथे गेले. ते साहील यांच्याशी बोलत असताना अचानक संशयित सहा जणांच्या टोळक्याने गाडे यांच्यावरही हल्ला चढवला. या मारहाणीत गाडे यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन चोरी झाली. तसेच मारहाणीत ते जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर पोनि अरविंद काळे यांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन तक्रारदार गाडे यांच्या तक्रारीवरुन संशयित सहा जणांविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
