सातारा : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती (Maharashtra Superstition Eradication Committee) सातारा शाखेमार्फत 154 वे जट निर्मूलन तारांगण, सातारा येथे करण्यात आले. गेल्या वर्षांपासून डोक्यावर जटेचे ओझे घेवून त्याबरोबर मणकेदुखी, ताप, मानसिक ताण, सामजिक अलगता या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागले. मग विचार करून जट काढण्याचा निर्णय शेजारच्या वायदंडे यांच्या सततचे सहकार्यामुळे घेतला, असे जयाताई यांनी सांगितले.
आज सातारा येथे नागठाणे गावातून जयाताई जट काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात आल्या. त्यांची ओळख प्रकाश खटावकर यांनी करून दिली. त्यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेणे विषयी सामाजिक कार्यकर्ते भगवान अवघडे यांच्या ओळखीतील वायदंडे यांनी जयाताई यांना सुचवले होते.
वंदना माने, सातारा जिल्हा अंनिस कार्याध्यक्षा व उदय चव्हाण कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समुपदेशक परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, सातारा यांनी योग्य काळजी घेत व समजदारपणाने माहिती देत दोन फूट लांब व 2 किलो वजनाची जट काढली.
जटांची वाढ का होते, मग रूढी, परंपरा यामुळे त्यात भर पडून ती जट शारीरिक, मानसिक, सामाजिक समस्या कशी बनते, हे वंदना माने यांनी स्पष्ट केले.
उदय चव्हाण यांनी केशांचे निगेबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोणताही दैवी त्रास होणार नाही, अशी खात्री जयाताई यांना दिली.
यावेळी अंनिस कार्यकर्ते डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, जयप्रकाश जाधव, विजय पवार, नाथाजी गायकवाड हे उपस्थित होते.
समाजातील अशा प्रकारचा अंधश्रद्धांबद्दल लोकांनी जागरूक होऊन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी केले.
