उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या अधिक दिवस टिकत नाही. मेथी, पालक, कांद्याची पात, कोथिंबीर किंवा पुदिन्याची पानं लवकर सुकतात किंवा पिवळी पडतात. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. पुदिन्याची चटणी, सरबत, स्मुदी, वाटणामध्ये देखील अनेक जण पुदिन्याची पानं घालून पेस्ट तयार करतात. पुदिन्याचा सुगंध आणि चवीमुळे पदार्थ अधिक चमचमीत होतो. पुदिना खाण्याचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत, तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत करते.
अनेक गोष्टींसाठी याचा वापर होत असल्याकरणाने, आपण एकाच वेळी जास्त पुदिना आणून ठेवतो, व पुदिना निवडून पानं फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतो. पण ओलाव्यामुळे पुदिना खराब होतो, किंवा त्याची पानं पिवळी पडतात. पुदिन्याची पानं अधिक दिवस फ्रेश ठेवण्यासाठी कोणते उपाय मदत करतील? पुदिना फ्रेश राहण्यासाठी कशापद्धतीने स्टोर करावे?
पाहूयात पुदिन्याची पानं कशी स्टोर करायची?
1) पुदिन्याची पानं अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी बाजारातून चांगली जुडी विकत आणा. त्याची पानं देठापासून निवडून घ्या. नंतर हवाबंद डब्यात एक टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपरमध्ये पुदिन्याची पानं पसरवून ठेवा, आणि डब्याचं झाकण लावा. डबा आपण फ्रिजमध्ये ठेऊ शकता. या टिप्सच्या मदतीने पुदिना, मिरची, कडीपत्ता आणि कोथिंबीर अधिक काळ फ्रेश राहील.
2) पुदिन्याची पानं अधिक काळ फेश ठेवण्यासाठी, एक जार घ्या, त्यात पाणी भरा. पाण्यामध्ये पुदिन्याच्या देठाची बाजू पाण्यात बुडवून ठेवा. काही वेळानंतर ओल्या कापडामध्ये पुदिना गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा. पुदिना १० दिवस आरामात टिकेल.
3) पुदिन्याची पानं निवडून झाल्यानंतर धुवून घ्या. फॅनखाली पुदिना वाळवून घ्या. ज्यामुळे त्याच्यातील ओलावा निघून जाईल, व त्यानंतर टिश्यूपेपरमध्ये पुदिना साठवून डब्यात ठेवा. ओलावा पूर्णपणे निघून गेल्यामुळे पुदिना आठवडाभर आरामात टिकेल.
पुदिना खाण्याचे फायदे :
पुदीना अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शिवाय यात अनेक खनिजे आणि जीवनसत्वे आढळते. मुख्य म्हणजे उन्हाळ्यात आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने शरीर थंड राहते आणि पचनक्रियाही सुधारते.
