Explore

Search

April 12, 2025 8:46 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

11th & 12th News : आता इंग्रजीची अकरावी, बारावीला सक्ती नाही, कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) – २०२४ मसुदा तयार केला आहे. त्यामध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गाकरिता दोन भाषा विषयांसह एकूण आठ विषय घेता येणार आहेत. नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल, तसेच काेणत्याही दोन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

इयत्ता अकरावी आणि बारावी (माध्यमिक स्तर टप्पा -२ साठी) दोन भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दोन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही दोन भाषा निवडण्याची मुभा असेल. दोन भाषाव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी असणार आहे. वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य आशा शाखांमधील साचेबद्ध बंधन नसणार आहे, तसेच उच्चशिक्षणासोबत सांगड घालण्याच्या दृष्टीने काही विषय नव्याने सुचविण्यात आले आहेत. विद्यार्थी भारतातील भाषांचा इतिहास व उत्क्रांतीबद्दल सविस्तर माहिती समजून घेतील, असा त्यामागील उद्देश आहे.

‘गट एक’मध्ये २६ भाषांमधून दोन विषय निवडावे लागतील. गट दोनमध्ये विज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन, गट तीनमध्ये सामाजिक शास्त्रे, कला शिक्षण, व्यवसाय शिक्षण, गट चारमध्ये गणित व गणितीय विचार व आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील विषयांचा समावेश आहे. गट पाचमध्ये आराेग्य शिक्षण व शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण हे दोन विषय सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असतील. एससीईआरटीच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर हा मसुदा वाचता येणार असून नागरिकांना त्यावर येत्या ३ जूनपर्यंत प्रतिक्रिया नाेंदविता येणार आहेत.

अशी करा दोन भाषा विषयाची निवड :

विद्यार्थ्यांना विषय १ आणि २ साठी दोन भाषा विषयांची निवड करावी लागेल. या दोन भाषांपैकी किमान एक भाषा मूळ भारतीय भाषा असावी. ताे एक विषय असणार आहे. या निवडलेल्या भाषेव्यतिरिक्त काेणतीही एक भाषा मूळ भारतीय भाषा व अन्य विदेशी भाषांपैकी एक भाषा विषय दोनसाठी निवडावी लागणार आहे. गट एकमध्ये १७ मूळ भारतीय भाषा आणि ९ अन्य विदेशी भाषा अशा एकूण २६ विषयांचा समावेश असणार आहे.

या २६ भाषांमधून निवडावे लागणार दोन विषय :

गट एकमधील मूळ १७ भारतीय भाषा : मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बेंगाली, पंजाबी, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री प्राकृत, अवेस्ता पहालवी तसेच अन्य ९ विदेशी भाषांमध्ये इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जापनीज, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन, अरेबिक या भाषांचा समावेश आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy