जिल्ह्यातील ३७ हजार ६५८ विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल सोमवार, दि. २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
याबाबतचे पत्रक राज्य परिक्षा मंडळाने काढले असून जिल्ह्यातील ३७ हजार ६५८ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून अवघड पेपर गेलेल्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.
दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरमधील टर्निंग पॉईंट असतो. शालेय जीवन संपून महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रारंभ होणार असल्याने दहावी बोर्ड परिक्षेचा टप्पा महत्वाचा आहे. उच्च शिक्षणासाठी विद्या शाखा निवडून करिअरची दिशा ठरवली जात असल्याने दहावी व बारावी बोर्ड परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची खरी कसोटी ठरते. मागील आठवड्यात बारावी बोर्ड परिक्षेचा निकाल लागल्यामुळे दहावी बोर्ड परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्येही निकालाची आतुरता वाढली आहे.
यावर्षी दहावी बोर्ड परीक्षा दि. ३ ते २६ मार्च या कालावधीत झाली. जिल्ह्यातील ११६ केंद्रावर ३७ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या निकालामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता सिध्द होणार असल्याने ज्यांना पेपर सोपा गेला त्यांना निकालाची उत्सुकता वाढली आहे. तर ज्यांना पेपर अवघड गेला आहे, अशा विद्यार्थ्यांमध्ये आपण उत्तीर्ण होणार की नाही, याबाबत धाकधुक वाढली आहे.
