मालमत्ता कर वसुलीचा पालिकेचा धडाका
वाई : वाई पालिकेच्या मुख्याधिकारीं संजीवनी दळवी यांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी कर्मच्यार्यांना घेऊन घरपट्टी पाणी पट्टी वसुलीचा धडाका लावला आहे. त्याप्रमाणे आज सकाळी पालिकेच्या मालकीची स्टेट बँकची इमारत केली सील केली. बँकेकडून भाडे रक्कम रुपये 21 लाख 63 हजार 954 येणे बाकी आहे.
वारंवार मागणी करूनही भाडे रक्कम व जुनी इमारत झाल्याने जागा खाली करण्याची नोटीस देऊन व पर्यायी जागा देऊनही जागा खाली करण्यास नकार दिल्याने, आज सकाळी पालिकेने बँकेची इमारत पोलीस बंदोबस्तात सील केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
शासनाची लोक वर्गणी भरणे अशक्य झाल्याने शासनाने वाई पालिकेचे दहा कोटी रुपयांचे अनुदान रोखले आहे.पालिकेची अडीच ते तीन कोटी वसुली होणे गरजेचे आहे.पालिकेची आर्थिक स्थती घसरल्याने अनुदान रोखण्यात आले आहे. त्याचा मोठा फटका पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर व शहर विकासावर झाला आहे. अगोदर आपली वसुली करा आणि मग अनुदानाला असे म्हणून शासनाने पंधरावा वित्त आयोग व घनकचरा व्यवस्थापनासाठी आणि इतर अनुदाने मिळून दहा कोटी रुपयांचे अनुदान रोखले आहे. त्यामुळे पालिकेने वसुलीचा धडाका लावला आहे.
पालिकेला स्टेट बँकेकडून रुपये 21लाख 63हजार 954, शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडून साडे अकरा लाख तसेच पालिकेचे गाळे व जागा वापरात असलेल्या भाडेकरू कडून दीड कोटी रुपये येणे आहे. 2011 सालापासून अनेकांनी भाडे भरलेले नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे भाडे वसूल करता आलेले नाही. नव्याने व फेरबद्दल झालेल्या अनेक मालमत्तांची नोंद पालिकेच्या कर यादीला नाही. शहरात घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम ही मोठी वसूल होणे बाकी आहे अशा सर्वांवर आता कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती कर निरीक्षक बाळासाहेब कांबळे व मालमत्ता पर्यवेक्षक मनोज बारटक्के यांनी दिली. पालिकेच्या गाळे धारकांची थकबाकी वसूल करण्यासाठी व अतिक्रमणे काढण्यासाठी लवकरच मोहीम राबवणार असल्याचे मुख्याधिकारी दळवी यांनी सांगितले.
दुपारी बँकेचे व्यवस्थापक जोशी यांनी 10लाख 48 हजार 321रुपये जमा केल्या नंतर सील काढण्यात आले.पुढील पंधरा दिवसात उर्वरित भाडे रक्कम व इमारत खाली करून पालिकेच्या ताब्यात देण्याचे हमीपत्र त्यांनी दिले आहे. यानंतर सील काढण्यात आली तोपर्यंत बँकेच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती त्यांनाही उन्हातानात बाहेर थांबावी लागल्याने व्यवहारांची अडचण झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
