चार जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेसह भुईंज पोलिसांची कारवाई
सातारा : खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह भुईंज पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 मे रोजी दुपारी पावणेचार वाजता एका मोबाईल वरून पोलिसांना कॉल आला की, शिरूर पुलाखाली अपघातातील जखमी पडला आहे. ॲम्बुलन्स व पोलीस पाठवा. या माहितीवरून भुईंज पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन जखमीला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवून दिले. मात्र दि. 23 रोजी उपचारादरम्यान संबंधितांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने तपास करीत असताना माळावरची झोपडपट्टी, सुरूर तसेच सुरूर गावातील दहा ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये संशयित हे दि. 19 रोजी एका मोटरसायकल वरून दोघांच्या मध्ये संबंधित जखमीस बसवून घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावरून संशय निर्माण झाल्याने तसा तपास केला असता माहिती मिळाली की, संबंधित व्यक्ती अपघातात जखमी झाला नसून त्यास संशयित जक्कल रंगा काळे आणि त्याच्या घरातील तीन लोकांसह संबंधीताचे जक्कल काळे याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले होते व त्यानंतर त्यास शिरूर पुलाखाली आणून टाकून दुसरा संशयित मक्शा रंगा काळे याने त्याच्या मोबाईल नंबर वरून पोलिसांना फोन करून अपघाताचा खोटा बनाव तयार केला होता. त्या अनुषंगाने मयताच्या तपासातून भुईंज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच संशयित जक्कल रंगा काळे, मक्शा रंगा काळे हे सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी संबंधितांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या संशयितांना पकडण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलीस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा यांचे पथक तयार करण्यात आले होते.
पथकाने संशयितांच्या ठावठिकाणांची माहिती काढून तीन पुरुष व एका महिलेस शिरूर परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे, संतोष सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, अरुण पाटील, अमित संपकाळ, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, ओंकार यादव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने, अमृत कर्पे, प्रवीण पवार, शिवाजी गुरव, महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री जाधव, रूपाली शिंदे यांनी सहभाग घेतला.
संशयित जक्कल रंगा काळे याच्यावर 28 गंभीर गुन्हे दाखल असून अट्टल गुन्हेगारांकडून खुनासारखा गंभीर गुन्हा उघड केल्याबद्दल कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
