सातारा : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
रिक्षांचा परवाना, पासिंग, गणवेश यासह इतर नियमांचे उल्लंघन केलेल्या कारवाईमधून सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वर्षभरात शहरातील शंभरहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करून तब्बल एक लाख १६ हजार महसूल जमा केला आहे. पुढील काळात देखील नियम न पाळणाऱ्या रिक्षांचालकांविरोधात आरटीओ विभाग तीव्र कारवाईची मोहीम राबविणार आहे.
गेल्या वर्षभरात आरटीओ विभागाने महसूल वसुली अधिक केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तपासणी पथकांच्या कामगिरीचाही आलेख वाढल्याचे दिसून येत आहे. या पथकाकडून वर्षभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महामार्गावर देखील कारवाईची मोहीम राबविली आहे. जेणेकरून अपघात रोखण्यास मदत होईल.
दरम्यान, शहरातील अनेक रिक्षाचालक ठरवून दिलेले गणवेश घालत नसल्याचे दिसून येते. यासह इतर वाहतुकीचे नियम शहरातील रिक्षाचालक पाळत नसल्याचे दिसून येते.
पथकांची नियुक्ती : सातारा शहरातील अनेक ठिकाणी अनधिकृत थांब्यावर रिक्षाचालक उभे असतात. मुख्य बस स्थानक असणाऱ्या ठिकाणी उलट्या दिशेने व बस स्थानकांबाहेर अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या असतात. या प्रकारामुळे अनेकदा अपघात घडल्याच्या घटना घडत आहेत. पोवई नाका, गोडोली या ठिकाणी बस थांबणाऱ्या ठिकाणी रिक्षाचालक उभे असतात. यासह राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, गोडोली नाका, जिल्हा परिषद परिसर, बस स्थानक परिसर या ठिकाणी रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्याने आरटीओ प्रशासनाने पथकांची नियुक्ती करत कारवाई केली आहे.
नियम न पाळल्याने कारवाई :
रिक्षाचालकांकडे इन्शुरन्स नसणे, पीयूसी, पासिंग, गणवेश न घालणे, नियमांपेक्षा जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधाची कारवाईची मोहीम सुरू आहे. रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करताना कागदपत्रे जवळ बाळगा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. – विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी
