Explore

Search

April 19, 2025 4:59 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज

पूरस्थिती हाताळण्यासाठी बोटिंग चाचणी

सातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एक जूनपासूनच आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तर पावसाळ्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात नदीमध्ये बोटिंग चाचणी घेण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध पातळीवर तयारी आणि उपाययोजना केल्या आहेत.

जिल्ह्यात जूनपासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे दोन ते अडीच महिने जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस कोसळतो. महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही.

तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असतो, झाडे पडतात. अशा काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा पाणी पात्राबाहेर जाते. यासाठीही जिल्हा प्रशासनाला दक्ष राहावे लागते. याकरिता जिल्हा प्रशासन एक महिना अगोदरच आढावा घेऊन तयारी करते. आताही पावसाळ्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दरवर्षी एक जूनपासून आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येतो. हा कक्ष २४ तास सुरू असतो. आताही हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. तसेच विविध विभागांचेही कक्ष सुरू राहणार आहेत. तर कराड आणि पाटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण होते. नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण होतो. या काळात उपाययोजना राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागाच्या वतीने कऱ्हाड येथील प्रीतिसंगम परिसरात बोटिंग चाचणी घेण्यात आली. यावेळी बोटी, लाइफ जॅकेट, दोरखंड, स्ट्रेचर आदींचा वापर करण्यात आला.

यावेळी कराड पालिकेचे पथक तसेच १५० होमगार्ड्स, नदी काठावरील गावांतील तरुण, तलाठी, मंडलाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, होमगार्डचे केंद्रनायक तुषार वरांडे आदी उपस्थित होते. कराडनंतर पाटण तालुक्यातही पूरस्थिती हाताळण्यासाठी बोटिंग चाचणी झाली. मुळगाव येथे कोयना नदीत हे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी तहसीलदार अनंत गुरव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणाचे तांत्रिक वर्ष एक जूनपासून सुरू झाले. तर धरणावर शनिवारपासूनच पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १७.५८ टीएमसी पाणीसाठा होता. पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेच्या सहा दरवाजांतूनही विसर्ग करावा लागतो. त्यामुळे कोयना नदीला पूर येतो. तसेच कऱ्हाड येथेही पूरस्थिती बनते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यावर पूर आणि दरड प्रवण गावांतील नागरिकांना त्यांच्या पशुधनासह तत्काळ हलविण्याची व्यवस्था करावी. नागरिकांच्या निवारा, अन्न, पाणी, वीज आदी सोयीसुविधांबरोबर जनावरांसाठी पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था करावी. नागरिकांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांच्याकडे द्यावी, अशी स्पष्ट सूचना केली होती.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy