सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजेच किंग ठरले आहेत. चुरशीच्या झालेल्या या लढतीत उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव केला आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकभा निवडणुकीत खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. हे समजताच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांनी लगेच जल्लोषाला सुरुवात केली. जलमंदिर पॅलेस येथे कार्यकर्ते जमू लागले. कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज अशा घोषणा देत जलमंदिर येथे गर्दी केली. त्यावेळी खासदार उदयनराजे हे भावनाविवश होत अश्रु अनावर झाले. त्यानंतर त्यांची जलमंदिर पॅलेस येथून ओपन जीपमधून कार्यकर्त्यांनी शिवतीर्थपर्यत मिरवणूक काढली. मिरवणूक पोवई नाका येथे येताच छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करत पुढे ही मिरवणूक मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोहचली.
आज सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिली फेरी संपल्यानंतर भाजपचे उमेदवार उदयनराजे यांनी केवळ 48 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंनी जोरदार कमबॅक करीत दुसर्या फेरीत 7 हजार 202 आणि तिसर्या फेरीमध्ये 10 हजार 841 मतांचे लीड घेत मुसंडी मारली. यानंतर शशिकांत शिंदे यांनी तब्बल 20 हजार मतांची आघाडी घेतली आणि पुढे ती वाढतच गेली. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे समजून शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला. परंतू हा जल्लोष औट घटकेचा ठरला. 14 व्या फेरीच्या अखेरीस पुन्हा उदयनराजेंनी 7 हजार मतांची आघाडी घेतली. पंधराव्या फेरी अखेर उदयनराजेंनी जवळपास 9 हजार 500 ची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली. यानंतर शशिकांत शिंदेंना उदयनराजेंचे लीड तोडता आले नाही. १४ व्या फेरीत उदयनराजे यांचे एक हजाराचे मताधिक्कय वाढले तर पंधराव्या फेरीत साडेतीन हजाराचे मताधिक्कय वाढले. ही आघाडी शेवटपर्यंत वाढत गेली. ती २३ व्या फेरीपर्यंत राहिली. तेवीसाव्या म्हणजेच शेवटच्या फेरीच्या अखेर उदयनराजेंनी 32 हजार 35 या मताधिक्याने शशिकांत शिंदेंचा पराभव करत अक्षरश: हा विजय खेचून आणला. २३ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ते विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली.
जलमंदिर येथे आलेल्या कार्यकर्तर्यानी त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढली त्यावेळी त्यांचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. राजपथावरुन फटाके फोडून सातारकर गुलालाची उधळण करत खासदार उदयनराजे यांचे स्वागत करत होते. पोवई नाका येथे शिवतीर्थाच्या जवळ डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या तालावर कार्यकर्ते भर उन्हात तल्लिन झाले होते. त्याचबरोबर शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्याही कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी डीजे लावून गुलालाची उधळण करत जल्लोष केला. मिरवणूकीमध्ये खासदार उदयनराजे हे कॉलर उडवत होते तर कार्यकर्ते शिट्या मारत होते. रस्त्यावर चौकाचौकात अगदी मतमोजणी केंद्रापर्यंत त्यांचे स्वागत होत होते. त्यांच्यासोबत ओपन जीपमध्ये आमदार महेश शिंदे, युवा नेते मनोज घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते होते.
उदयनराजे यांचा विजय जनतेला समर्पिंत
पहिले हे सांगू शकते की, हा विजय सर्व सातारकरांचा आहे. सर्व सातारकरांनी खूप मेहनत घेतली. सर्व सातारकरांची मी आभारी आहे. मी निकाल पाहत नव्हते. गुलाल आपलाच आहे, हे निश्चित केले होते. आईसाहेबांनाही ते सांगितले होते. उदयनराजे हे गेली २६ वर्षाहून अधिक काळ राजकारणात आहेत. मला राजकारण माहिती नाही. महाराज साहेबांना जनतेच काम करायचे आहे. त्यामुळे हा विजय जनतेला समर्पित करते.
– श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले.
