बदलांचे वर्तुळ पूर्ण झाल्याचा अनुभव इंटेरिअर क्षेत्रात येत असून अँटिक वस्तूंचा ट्रेंड परतला आहे. हा आमूलाग्र आणि कालसुसंगत बदल पर्यावरणाशी नाते जपणारा आणि जुन्या दिवसांची आठवण करून देणारा आहे. भलेही लाकडी इंटेरिअर अत्यंत महागडे असले तरीही घरात किमान एकतरी लाकडी वस्तू, हँण्डक्राफ्ट असावे याबाबत इच्छुक आग्रही असून लाकडी टाइल्स आणि लाकडी फर्निचर, खेळणी, सजावटीच्या वस्तूंपासून ते स्वयंपाकघरातील ॲक्सेसरीजची मोठी रेंज बघायला मिळते.
पूर्वी घरोघरी लाकडी वस्तूंचा वापर व्हायचा. कालांतराने लाकडी वस्तूंना पर्याय तयार झाले. आता पुन्हा त्याच जुन्या वस्तूंना अँन्टिक ट्रेंड म्हणून पसंती मिळत आहे. आधुनिक घरातही जुन्या वस्तूंचा ट्रेंड कल्पकपणे राबवता येतो. लाकडी स्टूल, पेट्या, कपाट, लाकडी चमचे, ट्रे, लाकडी घर, वॉल डेकोर व इतर शोभेच्या वस्तू पुन्हा ट्रेंडमध्ये आहेत. कमी जागेत उपयुक्त, साजेसे आकार आणि डिझाइन यामुळे लाकडी फर्निचर कमालीचे लोकप्रिय होत आहेत.
यालाच जोड देत पारंपरिक रंगासोबत चटकदार रंगांचा वापर केलेल्या फर्निचरचा उपयोग मोठमोठ्या हॉटेल्स, कॅफेंमध्ये होतो. अगदी तसाच उपयोग घरातही होतो. लॅपटॉपचा लाकडी टेबल, लाकडी देवघरासोबत पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी छोटी कपाटं, पाट, छोटे स्टुलचे असंख्य आकार आणि प्रकार मिळतात.
लाकडी खुळखुळे, गाड्या, वेगवेगळ्या आकाराचे भोवरे, बॅट, लाकडी बैलगाड्या, शोभेची फळं, स्वयंपाकघरातील ॲक्सेसरीज, जसे लाकडी चमचे, चटणी-मीठाचा डब्बा, लोणचे ठेवायची बरणी, लाकडी वाट्या, प्लेट, प्लँकर, लाकडी ट्रे, टी-कोस्टर, किचेन होल्डर, दागिने ठेवायची कुपी ते आरसा यांचा उपयोग वापरासाठी होतो.
या वस्तू होम डेकोर म्हणूनही वापरल्या जातात. यात सर्वाधिक आकर्षक आहेत ती वॉल हँगिंग. ‘लाकडी लॉग’ टांगून त्यात आपले पुस्तक, शोपीस किंवा कुंडी ठेवली जाते. घरात कुठेही सुती दोरी बांधून लाकडी लॉग लावता येतो.
यामुळे घराचा तो कोपरा उठून दिसतो.जुन्या घरांमध्ये पारंपरिक लाकडी दुभाजक (डिव्हायडर) वापरला जायचा. जो आडोसा म्हणून वापरला जातो. हा आडोसा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवता येत असल्याने पोर्टेबल रूम तयार होते. छोट्या घरांमध्ये हे पोर्टेबल दुभाजक वापरली जात आहेत.
‘वुडन कार्ट’ तर अलीकडचा अत्यंत लोकप्रिय प्रकार. या कार्टला बॉक्स स्टोरेज म्हणून वापरले जाते. अत्यंत मजबूत, दणकट व चांगल्या दर्जाचे लाकूड वापरून कार्ट तयार होतात. कार्टमध्ये दरवेळी नवनवीन डिझाइन येतात. कार्ट बसण्यासाठी, वस्तू ठेवण्यासाठी तर वापरता येतोच. शिवाय यात पुस्तके किंवा अन्य वस्तू आरामात ठेवता येतात.
लाकडी ‘आलमारी’ आणि लाकडी ‘पेट्या’ किंवा ‘संदूक’सुद्धा लोकप्रिय आहेत. एकतर या वस्तूंसाठी अत्यंत वेगळे आणि जरा बोल्ड रंग वापरले जातात. शिवाय या वस्तू छोट्या जागेत आरामात बसतात. संदूकचे बजेट जास्त असले तरीही स्टोरेजसाठी संदूकचा उपयोग होतो. शिवाय या देखण्या संदूक जुन्या दिवसांना रिकनेक्ट करतात.
घरातच ‘कॉफी टेबल’ बनवताना लाकडी ‘फ्लॉवर पॉट्स’सुद्धा छान पर्याय ठरतो आहे. घरातील छोटा कोपरा, व्हरांडा, गॅलरी, स्वयंपाकघरातील कोपऱ्यात लाकडी कुंडी आणि छोटेसे इनडोअर प्लांट लावून तिथेच कॉफी टेबल करण्याचे शेकडो रील्स सोशल मीडियावर दररोज अपलोड होत आहेत.
स्वयंपाकघराला जुन्या काळात नेताना लाकडी वस्तूंचा वापर वाढत आहे. ज्या दिसतातही छान आणि वापरायला छान वाटतात. काचेच्या झाकणाचा चौकोनी लाकडी कप्पे असलेला चटणी-मिठाचा डब्बा, वेगवेगळ्या आकारातील खलबत्ते, चमचे, गोल,चौकोनी, पसरट ट्रे बघताच स्वयंपाक करण्यात कमालीचा उत्साह वाटतो. लाकडी टाइल्ससुद्धा मिळतात.
याला लॉक सिस्टीम असते. या टाइल्स शक्यतो बेडरूममध्ये वापरल्या जातात. अर्थात या टाइल्स खर्चिक असतात. पण, हौसेला मोल नाही. ‘वुडन कलर’लासुद्धा सध्या मागणी वाढली आहे. हुबेहूब लाकडी फर्निचर किंवा लाकडी टाइल्ससारख्या दिसणाऱ्या टाइल्स लक्ष वेधतात.
वॉल हँगिंग, शोपीस, लाकडी आरसे खूप सुंदर दिसतात. अलीकडे वॉल डेकोरचा ट्रेंड असून, लाकडी वस्तूंचा उपयोग केला जातो. यामध्ये क्रिएटिव्हीटीवर भर असून ‘वुडन फ्लोरिंग’ केले जाते. :शुभांगी कुलकर्णी, आर्टिस्ट
रेडीमेड फर्निचरऐवजी घरातील जागा बघून तंतोतंत माप घेऊन ‘मॉड्युलर’ फर्निचर तयार केले जाते. यात वेळ वाचतो आणि हे फर्निचर असेंम्बल करावे लागते. दरवाजांसाठी सागवान आणि होम डेकोरसाठी देवदारचे लाकूड वापरले जाते. : अशोक सुरासे, लाकडी वस्तू बनवणारे आर्टिस्ट
