मुंबई : बॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काजोलबरोबर ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. ३७ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्री नूर मालाबिका दास ही तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती, त्यानंतर ओशिवरा पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, शेजाऱ्यांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांना तिच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिसांना माहिती दिली. पथकाने घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा तोडला असता नूरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अभिनेत्रीचा मृतदेह पोलिसांनी तिच्या लोखंडवाला येथील फ्लॅटमधून ६ जून रोजी जप्त केला होता. नूरने बेडरूममधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई केली. मात्र, तिच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
