आजकाल प्रत्येक घरात ब्रेड आवडीने खाल्ला जातो. चहा, मिसळ,पावभाजीसोबत हमखास ब्रेड असतोच. काहीवेळा नाश्ता तयार नसेल तर घाई-घाईत ब्रेड-बटर मुलांना खायला घातला जातो. मुलही चपाती-भाजी सोडून असे पदार्थ आवडीने खातात. पण तुम्हाला माहितीय का ब्रेड-बटर खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, असे स्पष्ट केले आहे.
ICMR ने सांगितले की, ब्रेड बटर आणि रिफाइंड ऑइल हे आरोग्यासाठी सर्वात हानिकारक अन्नपदार्थांपैकी एक आहे. या पदार्थांमुळे लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याची माहिती घेऊयात.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, ब्रेड, बटर आणि स्वयंपाकाच्या तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. कारण या तिन्ही गोष्टी अल्ट्रा प्रोसेस्ड आहेत. ज्यात, साखर, मीठ, तेल आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अधिक असतात.
या पदार्थांमध्ये ब्रेड, बटर आणि स्वयंपाकाचे तेल याशिवाय थंड पेये, मैद्यापासून बनवलेले गोड पदार्थ, पॅकेज केलेले स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, कुकीज हेही प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत. आणि ते खाणे देखील टाळावे.
ICMR च्या मते, ब्रेड, बटर, रिफाइंड कुकिंग ऑइल यासारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे जास्त काळ सेवन केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. इतकेच नाही तर दीर्घकाळ सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मेंदूचे नुकसान यांसारख्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात.
या अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यात फायबरचे प्रमाण खूप कमी असते. एवढेच नाही तर त्यात रासायनिक संरक्षक आणि रंगांचा वापर केलेला असतो. हे लगेच खायला खूप चविष्ट आणि सोयीस्कर वाटतात.
पण दीर्घकाळ सेवन केल्यास ते आरोग्यासाठी स्लो पॉयझनपेक्षा कमी नाही. या खाद्यपदार्थांऐवजी, तुम्ही ताजी फळे, भाज्या, धान्ये, उच्च फायबर आणि कमी कॅलरी असलेले अन्नपदार्थ घेऊ शकता.
