Explore

Search

April 20, 2025 3:43 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Agriculture News : सातारा जिल्ह्यात पेरण्यांना झाली सुरुवात

सातारा : जिल्ह्यात मान्सून वेळेत सुरू झाला असून सर्वदूर पाऊस पडलेला आहे. यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण असून पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. आतापर्यंत ५ हजार क्विंटल बियाणे आणि २२ हजार मेट्रिक टन खताची विक्री झालेली आहे, तसेच कृषी निविष्ठा दुकानातही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरिपासाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील, असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीने नियोजन झालेले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रामुख्याने खते आणि बियाणे आवश्यक असतात. पाऊस वेळेत सुरू झाला तर पेरणीही उरकते; पण गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे पेरणी कमी झाली. यंदा खरिपावर दुष्काळाचे सावट होते, तरीही कृषी विभागासह शेतकरीही तयारीत होते. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा समावेश आहे.

यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणे अपेक्षित आहे, तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत २८ हजार १६२ क्विंटल बियाणे उपलब्धही झाले आहे. त्यामुळे आता जरी पेरणी सुरू केली तरी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर पिकांसाठी खतांची आवश्यकता राहते. यासाठी शासनाने खरीप हंगामाकरिता १ लाख ९ हजार ५०१ मेट्रिक टन खतसाठा मंजूर केलेला आहे. १ एप्रिलपासून ७० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे, तर सुमारे २२ हजार मेट्रिक टन खताची विक्रीही झाली आहे.

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात वेळेवर पाऊस पडणार का अशी चिंता होती; पण मान्सूनने ही चिंताही दूर केली आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा अशा सर्वच तालुक्यात चांगला पाऊस पडलेला आहे, तसेच काही गावांतील ओढ्यांना पाणी आले असून बंधाऱ्यातही साठा झाला आहे. त्यामळे पेरणीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे. त्यातच खते आणि बियाणेही बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

१२ भरारी पथके करणार कारवाई..

दरवर्षीच खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन केली जातात. ही पथके बोगस खते, बियाणेप्रकरणी कारवाई करतात. आताही कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशी मिळून १२ पथके स्थापन केली आहेत. त्यांचे लक्ष बोगस खते, बियाणे विक्री, भेसळ यावर असणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडू लागला आहे. अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होणार आहे, तसेच कृषी विभागाच्या वतीनेही खरीप हंगामासाठी पुरेशी खते आणि बियाणे उपलब्ध आहेत. पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कृषी विभागाकडून पूर्णपणे नियोजन करण्यात आलेले आहे. – विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy