मुंबई : डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. त्यामुळे डोंबिवलीतील लोकांनी आपला जीव कधीतरी जाणार असं गृहित धरून जगायचं का? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन अद्याप महिना देखील झाला नाही, तोच दुसऱ्या स्फोटाने डोंबिवलीकरांच्या भीतीमध्ये भर पडली आहे. फेज-२ मधील मालदे आणि इंडो अमाईन्स या दोन कंपन्यांना आग लागली. डोंबिवलीतील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
प्रत्यक्षदर्शी सुरक्षारक्षक हिरामण तिवारी यांनी सांगितलं की, ”सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक कंपनीमध्ये स्फोट झाला. त्यानंतर सगळे कर्मचारी बाहेर पळत आले. कंपनीला आग लागली आणि जवळच्या दुसऱ्या एका कंपनीमध्ये आग पसरली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग इतकी भीषण होती की, सात ते आठ गाड्या आग विझवण्याचे काम करत होत्या.”
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या जवळच अभिनव नावाची शाळा आहे. आगीमध्ये शाळेच्या पार्क केलेल्या तीन स्कूल व्हॅन जळून खाक झाल्या आहेत. शाळा आग लागलेल्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर आहे. आग शाळेपर्यंत पसरली असती तर काय? असा प्रश्न स्थानिक आणि शिक्षक विचारत आहेत.
कंपनीला आग लागल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतून सोडण्यात आले असं एका शिक्षकाने सांगितले. शाळेच्या जवळच केमिकलच्या कंपन्या असणे किती धोकादायक आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. अनेक लोकांना धुराचा त्रास होऊ लागला आहे.
