वर्ल्ड कपमधून पाकिस्तान जाणार बाहेर?
नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा रोमांच सध्या शिगेला पोहचला आहे. सुपर-8 फेरीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे चार गटांतील सामने अधिकच रोमांचक होत आहेत. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ खेळत आहेत. मात्र, पहिल्या फेरीनंतर केवळ आठ संघच सुपर-8 फेरीत पोहोचतील आणि 12 संघ बाहेर पडतील.
या 12 संघांपैकी अनेक बड्या संघांना बाहेर होण्याचा धोका आहे. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या मोठ्या देशांचा समावेश आहे. आता अमेरिकेतून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. त्याने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले असून या कालावधीत त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला. आता त्यांचा एकमेव सामना बाकी आहे तो आयर्लंडविरुद्ध आहे. पण सुपर-8 मध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला इतर संघांवर अवलंबून राहावे लागत आहे.
पाकिस्तानला आपला पुढचा सामना फ्लोरिडामध्ये आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. सुपर-8 मध्ये जाण्यासाठी त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तानी संघ शर्यतीतून बाहेर पडेल. याशिवाय 14 जून रोजी फ्लोरिडामध्येच अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यावरही पाकिस्तानची नजर असेल. कारण हा सामना अमेरिकेने जिंकला तर पाकिस्तान बाहेर पडेल. या सामन्यात आयर्लंडने अमेरिकेला पराभूत करावे अशी प्रार्थना त्यांना करावी लागेल.
पण फ्लोरिडातील सध्याची हवामान स्थिती पाकिस्तानसाठी चिंताजनक आहे. फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस पडत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पावसामुळे सामना वाहून गेला तर पाकिस्तानी संघ आणि चाहत्यांच्या आशा पल्लवित होतील.
यूएसए विरुद्ध आयर्लंड, भारत विरुद्ध कॅनडा आणि आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान सामने फ्लोरिडामध्ये होणार आहेत, परंतु सध्याची परिस्थिती पाहता हे सर्व सामने रद्द केले जाऊ शकतात. याचा भारतीय संघावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण संघ आधीच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे, पण पाकिस्तानच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो.
