Explore

Search

April 13, 2025 10:30 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Crime News : काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

सातारा : काळविटाची शिकार करून त्याच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. वारुंजी फाटा-कराड येथे बुधवारी रात्री उशिरा वनविभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

रत्नाकर हनुमंत गायकवाड (वय ४२, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), अमर भगवान खबाले (वय ३५), इलाई सय्यद शेख (वय ५०) व विशाल संभाजी शिंदे (वय ३१, तिघेही रा. कऱ्हाड) अशी वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, कराड जवळील वारुंजी फाटा येथे एका हॉटेलसमोर दोघेजण संशयास्पदरीत्या फिरत असून त्यांच्याकडे वन्यप्राण्यांची शिंगे असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, आर.एस. नलवडे, सागर कुंभार, आनंदा जगताप, बाबूराव कदम, सचिन खंडागळे, शीतल पाटील यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री उशिरा सापळा रचला.

वनविभागाचे पथक वारुंजी फाटा येथील हॉटेलसमोर पोहोचले. त्यावेळी त्यांना रत्नाकर गायकवाड आणि अमर खबाले हे संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ काळविटाची चार शिंगे आढळून आली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता या तस्करीत आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने इलाई शेख आणि विशाल शिंदे या दोघांना ताब्यात घेतले.

संबंधित चौघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून काळविटाची चार शिंगे आणि चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पाटणच्या सेवानिवृत्त पोलिसाचा हात !

वनविभागाकडून काळविटाच्या शिकारीबाबत आरोपींकडे कसून चौकशी केली जात आहे. या चार आरोपींनी ही शिंगे पाटण येथील एका सेवानिवृत्त रेल्वे पोलिसांकडून घेतली असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे वनाधिकारी त्या सेवानिवृत्त पोलिसाकडे तपास करणार आहेत. रेल्वे पोलिसाने ती शिंगे कोठून आणली, काळविटाची शिकार कोठे आणि कुणी केली, त्यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याबाबतचा तपास वनविभागाकडून केला जात आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy