कृषिपंपांना मिळणार दिवसा वीज
कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ४८ गावांत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० तथा सोलर पार्क प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या योजनेस जमीन देण्यास काही गावांनी नकार दर्शविलेला आहे.
त्यातील एका ग्रामपंचायतीने तर एकतर्फी जागा हस्तांतरित केल्याने शासन निर्णयाविरुद्ध थेट न्यायालयात धाव घेतलेली आहे. शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून गावपातळीवर सौर ऊर्जा निर्माण करून ती शेतीपंपांना दिवसा अखंडित आणि शाश्वत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सहा मे २०२३ रोजी घेतलेला आहे.
त्यासाठी खासगी, शासकीय जमीन, शासनाकडील अंगीकृत महामंडळे, कृषी विद्यापीठे, शासकीय विभागांकडे उपलब्ध असलेल्या विनावापर, पडीक जमिनी (गायरान वगैरे) या महावितरण, महानिर्मिती व महाऊर्जा यांना ३० वर्षांच्या नाममात्र वार्षिक एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
त्यासाठी त्या- त्या गावातील ग्रामपंचायतींना सलग तीन वर्षे प्रत्येकी पाच लाख रुपये निधी प्रोत्साहनपर अनुदानाच्या रूपाने देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ४८ गावांतील २६५ हेक्टर ९१ आर क्षेत्र महावितरणला भाडेपट्ट्याने हस्तांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान, महावितरणला हस्तांतरित करण्यात आलेल्या कुमठे (ता. कोरेगाव) येथील गायरान क्षेत्रात महावितरण तथा ठेकेदार कंपनीने नुकतेच सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे प्राथमिक काम सुरू केले.
निवडलेली गावे
- सातारा : वडूथ, गणेशनगर, भाटमरळी, कोपर्डे, निगडी वंदन
- कऱ्हाड : पेरले, टेंभू, वहागाव, वडगाव हवेली, घारेवाडी, शिरवडे, पोतले, नवीन नांदगाव – गट क्रमांक २५०, नवीन नांदगाव – गट क्रमांक २५०, मनू, कालवडे, विंग, हणबरवाडी, कामथी.
- कोरेगाव : पिंपोडे बुद्रुक, सासुर्वे, चंचळी, तारगाव, कुमठे, भाकरवाडी.
- खटाव : सूर्याचीवाडी, कातरखटाव गट क्रमांक ५९९, कातरखटाव गट क्रमांक ६४९, हिवरवाडी, धोंडेवाडी, विखळे, राजापूर गट क्रमांक १७३२, राजापूर गट क्रमांक ४२७.
- माण : बिजवडी, शेनवडी, देवापूर गट क्रमांक १०६, देवापूर गट क्रमांक ५४.
- फलटण : कापडगाव, टाकळवाडी, वाखरी, सासकल, शेरेचीवाडी.
- खंडाळा : भादे, मरिआईचीवाडी.
- पाटण : अंबवडे खुर्द, बेलवडे खुर्द, सोनाईचीवाडी.
- वाई : मेणवली.
- ग्रामपंचायतींना सलग तीन वर्ष ५ लाखांचे अनुदान
- कुमठे, भाकरवाडी ग्रामपंचायतीचा जागा देण्यास विरोध
- एकतर्फी जागा हस्तांतरित केल्याने कुमठे ग्रामपंचायतीचा शासन निर्णयाविरुद्ध थेट न्यायालयात धाव
कुमठे गायरान क्षेत्र सौरऊर्जा प्रकल्पास देण्यास ग्रामपंचायत व ग्रामसभेचा विरोध आहे. आमचा विरोध आम्ही ठरावांच्या नक्कल प्रतींसह वेळेत प्रशासनास दिल्या आहेत, तरीही प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतलेला असल्याचे दिसते आहे. त्यावर आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत. – संतोष चव्हाण, सरपंच, कुमठे ग्रामपंचायत
