महावितरणची 24 तास सेवा उपलब्ध
सातारा : पावसाळ्यामुळे वीज वितरण यंत्रणेमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या बिघाडामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच मोठी दुर्घटना होण्याचीही भीती व्यक्त होते. त्यामुळे वीज सुरक्षेत कोणत्याही प्रकारचा बिघाड तातडीने निदर्शनास यावा, यासाठी वीज वितरण कंपनीने नागरिकांसाठी व्हॉटस्ॲप (WhatsApp) यंत्रणा सुरू केली आहे. याद्वारे माहिती मिळाल्यावर बिघाड तातडीने दुरुस्त केला जाणार आहे.
पावसाळ्यात होतात अनेक समस्या
पावसाळ्यामध्ये काही वेळा वादळी वारेही वाहात असते. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटना घडत असतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असतो.
बिघाडांसाठी व्हॉटस्ॲप यंत्रणा
बारामती परिमंडळ अंतर्गत महावितरणकडून सातारा जिल्ह्यासाठी ९०२९१६८५५४ हा व्हॉटस्ॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती पाठवायची आहे. नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस्ॲपद्वारेच ही माहिती द्यायची आहे. ज्या नागरिकांकडे व्हॉटस्ॲप सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी ‘एसएमएस’द्वारे वरील मोबाईल क्रमांकावर माहिती द्यायची आहे. यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.
पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी व्हॉटस्ॲपद्वारे तक्रारी कळवाव्यात तसेच महावितरणचे रोहित्र, फिडर पिलर, वीजखांब आदींवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, पत्रके चिकटवू नयेत. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याच्या संभाव्य दुर्घटना टाळता येतील,–अंकुश नाळे, संचालक, पुणे प्रादेशिक
व्हॉटस्अपद्वारे मिळालेल्या माहिती किंवा तक्रारीवर तातडीने कारवाई होणार आहे. ही माहिती लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. संबंधित विभाग आवश्यकता भासल्यास नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे. दुरुस्ती केल्याबाबत तसेच प्रस्ताव पाठविल्याबाबतची माहिती संबंधित तक्रारकर्त्यांना तसेच माहिती देणाऱ्या वीज वितरणकडून कळविण्यात येणार आहे.
