Explore

Search

April 20, 2025 3:46 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Karad News : पट्टेरी वाघाचे सह्याद्री प्रकल्पात अस्तित्व

वन्यजीव विभागाने वाघाला  टी-१अशी वेगळी ओळख दिली

 कराड : ‘सह्याद्री’त वाघांचे अस्तित्व यापूर्वीच अधोरेखित झाले आहे. मात्र, एका पट्टेरी वाघाने प्रकल्पात मुक्कामच ठोकलाय. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून तो येथे मुक्तपणे वावरतोय. ठिकठिकाणच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये तो कैदही झाला आहे. सह्याद्रीत दीर्घ कालावधीसाठी वास्तव्याला असलेला हा पहिलाच वाघ असल्यामुळे वन्यजीव विभागाने त्याला ‘टी-१’ अशी वेगळी ओळख दिली आहे.

पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शेकडो प्रजातींचे हजारो प्राणी आढळतात. या प्राण्यांची नोंद ठेवणे सहजशक्य नसल्यामुळे त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी प्रकल्पात दोनशेहून जास्त कॅमेरे लावण्यात आले आहेत. चोवीस तास या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रकल्पातील प्राण्यांची छायाचित्रे घेतली जातात. याच कॅमेऱ्यांत वारंवार वाघ कैद झाले होते. त्यामुळे येथे वाघांचे अस्तित्व असल्याचा ठोस पुरावा वेळोवेळी हाती लागला आहे.

आजपर्यंत येथे वावरणारे वाघ ठराविक कालावधीनंतर दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पाकडे निघून गेल्याचेही आढळून आले आहे. मात्र, एक वाघ गत सहा महिन्यांपासून सह्याद्रीतच वास्तव्यास आहे. प्रकल्पातील गर्द झाडीत त्याचा मुक्काम असून, वेगवेगळ्या कॅमेऱ्यांत त्याचे शेकडो फोटो कैद झाले आहेत. हे फोटो हाती लागल्यानंतर आणि त्याच्या दीर्घकाळ वास्तव्याची खात्री पटल्यानंतर वन्यजीव विभागाने त्याला ‘सह्याद्री टी – १’ अशी ओळख दिली असून, नोंदही घेतली आहे.

पहिलाच वाघ; पहिलेच मार्किंग

सह्याद्री प्रकल्पात आढळलेल्या विष्ठा संकलित करून ‘डीएनए’ तपासणी केल्यानंतर देहरादुनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने येथे सात वाघांचा वावर झाला असल्याचे विश्लेषण केले होते. मात्र, त्यापैकी एकही वाघ येथे मुक्कामी नव्हता. ते वाघ दक्षिणेतून उत्तरेकडे आणि उत्तरेतून पुन्हा दक्षिणेकडे निघून जात होते. मात्र, ‘टी-१’ हा पहिलाच असा वाघ आहे की जो दीर्घकाळ सह्याद्रीत आहे. त्यामुळे वन्यजीवकडून त्याला पहिले ‘मार्किंग’ मिळाले आहे.

१२ डिसेंबर २०२३ रोजी पहिल्यांदा दिसला…

‘टी-१’ हा वाघ पहिल्यांदा १२ डिसेंबर २०२३ रोजी कॅमेऱ्यात कैद झाला होता. तेव्हापासून आजअखेर वेगवेगळ्या कॅमेऱ्यांत तो दिसत आहे. वन्यजीव विभागाने कर्नाटकच्या काली व्याघ्र प्रकल्पातही त्याचे यापूर्वीचे अस्तित्व शोधले आहे. मात्र, त्याठिकाणी त्याचा वावर यापूर्वी आढळून आलेला नाही.

प्रकल्पातील वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या कॅमेऱ्यांत हा नर वाघ शेकडोवेळा कॅमेराबद्ध झाला आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून तो प्रकल्पात आहे. त्यामुळे त्याला ‘सह्याद्री टी-१’ असे मार्किंग करण्यात आले आहे. संग्राम गोडसे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सह्याद्री

सह्याद्रीत वाघ असणे म्हणजे तेथील जैवविविधता आणि अन्नसाखळी परिपूर्ण असल्याचे द्योतक आहे. वाघाला लागणारे तृणभक्षी प्राणी सह्याद्रीत मुबलक प्रमाणात आहेत. वन्यजीव विभागाच्या उत्तम नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy