प्रवेशोत्सव दिनी विद्यार्थ्यांचे घेतले पावलांचे ठसे …
सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रमध्ये शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या विविध शाखांमध्ये शाळा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी व अनोख्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
संस्थेच्या कै. सौ कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कुसवडे, न्यू इंग्लिश स्कूल कुसवडे ता.जि. सातारा, श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली ता. जि. सातारा, न्यू इंग्लिश स्कूल जायगाव ता. जि. सातारा या शाखांमध्ये शाळा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सर्व शाखांमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचे औक्षण करून त्यांची सवाद्य मिरवणूक काढून उत्साहाच्या वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे तसेच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्थेकडून प्राप्त करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या किटचे वितरण गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे कागदावर घेऊन, त्याचा संग्रह तयार करून तो कायमस्वरूपी शाळांमध्ये जतन करून ठेवण्याचा एक अनोखा उपक्रम संस्थेच्या सर्व शाखांमध्ये संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या शाळांमध्ये प्रथम पाऊल ठेवले, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. भविष्यामध्ये विद्यार्थी कर्तुत्वाने व वयाने कितीही मोठा झाला तरी त्यांनी ज्या शाळेमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले होते त्या आठवणी पावलांच्या ठशांच्या रूपात त्या विद्यार्थ्यास कायमस्वरूपी पाहता याव्यात हा या उपक्रमा मागचा उद्देश होता.
संस्थेच्या माने कॉलनी सातारा या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाखेमध्ये कोडोली केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख मा. संजय सातपुते, संस्थेचे उपाध्यक्ष मा. निर्मलसिंग बन्सल, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अमोल काटे, संतोष रासकर यांच्या शुभहस्ते नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक तसेच शैक्षणिक साहित्याच्या कीटचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर केंद्रप्रमुख मा. संजय सातपुते यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शाळेने राबवलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त करून कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल व शैक्षणिक कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक अँड.मनजीत माने,श्री.गुलाब माने शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी तसेच पालकांच्या आठवणीत रहावा यासाठी शाळेने सेल्फी पॉइंट ची निर्मिती केली होती. या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून अनेक पालकांनी, विद्यार्थ्यांनी आपले फोटो काढून या सेल्फी पॉईंटचा लाभ घेतला. शाळा प्रवेशदिनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा सर्व पालकांमधून होत होती. या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पालकांनी समाधान व्यक्त केले.
