Explore

Search

April 13, 2025 10:25 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Gujarat News : पावागड टेकडीवरील मूर्ती हटविल्याने जैन समाज संतप्त

पावागड (गुजरात) : टेकडीवरील श्री महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या जैन तीर्थकरांच्या मूर्ती हटविण्यात आल्याने जैन समाजात संतापाची लाट उसळली असून, याला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत समाजाच्या सदस्यांनी पावागड पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी आंदोलन केले.

२२ वे तीर्थंकर भगवान नेमीनाथ यांच्या मूर्तीसह अन्य सात मूर्ती तोडफोड करून हटविण्यात आल्या. यामुळे जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. पावागड ट्रस्टच्या संबंधितांशी चर्चा सुरू असून, मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या अन्य कोणत्याही मागण्या नाहीत, असे समाजाच्या एका नेत्याने सांगितले. सरकारने पावागड तीर्थक्षेत्रावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तेथे ११ जैन डेरे आहेत. असे असताना जैन मंदिरांचाही तीर्थक्षेत्र विकासात समावेश का केला जाऊ नये, याचा अर्थ आम्ही अल्पसंख्याक आहोत आणि त्यामुळे आमची उपेक्षा करण्यात येत आहे का, असा सवाल करत त्यांनी जैन तीर्थक्षेत्रांच्या विकासाप्रति सरकारकडून दर्शविली जाणाऱ्या बांधीलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आम्ही मूर्तीची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत, असेही ते म्हणाले.

बडोदा समस्त जैन संघाच्या शिष्टमंडळाने रविवारी बडोदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जैन मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करावी आणि या कृत्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले. तसेच सुरतमध्येही समाजाच्या शिष्टमंडळाने सुरत जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय रावल यांना निवेदन दिले.

हजारो वर्षांपासून टेकडीवर मूर्ती

गुजरातचे मंत्री हर्ष संघवी म्हणाले की, ‘पावागड ही ऐतिहासिक भूमी आहे. तेथील टेकडीवर हजारो वर्षापासून जैन तीर्थकरांच्या अनेक मूर्ती आहेत. कोणत्याही ट्रस्ट, संस्था किंवा व्यक्तीला अशी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक मूर्ती नष्ट करण्याची परवानगी नाही. जैन धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याची खबरदारी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या मूर्तीची मूळ जागेवर प्रतिष्ठापना करण्यात येईल, येत्या काही तासांत या मूर्ती मूळ स्थानी असतील.’

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy