मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत पण आजवरचा त्याचा खूप गाजलेला सिनेमा म्हणजे ‘बजरंगी भाईजान.’ अतिशय गाजलेल्या या सिनेमातील पवन आणि त्याला सापडलेली लहान मुलगी मुन्नी यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली. अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने सिनेमात मुन्नीची भूमिका साकारली होती. ही तिची भूमिका खूप गाजली आणि या सिनेमात तिच्यावर चित्रित केलेला शेवटचा सीनही चर्चेत राहिला.
या सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये मुन्नी पवनला हाक मारताना जय श्री राम म्हणते असं दाखवण्यात आलं होतं पण तुम्हाला माहितीये का ? हा संवाद कोणत्यातरी वेगळ्याच मुलीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी हा किस्सा नुकताच एका मुलाखतीमध्ये शेअर केला.
‘चंदू चॅम्पियन’ सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने दिग्दर्शक कबीर खान यांनी नुकतीच मॅशेबल इंडियाच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी हा किस्सा शेअर केला. ते म्हणाले,”सिनेमातील साऊंड मिक्सिंगचा शेवटचा दिवस होता आणि जवळपास ११ वाजता माझ्या टीमच्या लक्षात आलं कि हर्षालीने जो शेवटी जय श्री राम संवाद म्हंटलाय त्याचा आवाज नीट नाहीये. त्यांनी थोडा नीट करून पहिला पण ते व्यवस्थित ऐकू येत नव्हतं. माझी मुलगी सायरा त्या वेळी सहा वर्षाची होती. मी माझ्या बायकोला मिनीला फोन लावला आणि सायराला स्टुडिओला घेऊन यायला सांगितलं, हर्षालीला एवढ्या रात्री स्टुडिओमध्ये आणणं शक्य नव्हतं. मग सायराने तो शेवटचा डायलॉग म्हंटला.”
बजरंगी भाईजान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ९६९ करोड रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात सलमान आणि हर्षाली यांच्याबरोबर करिना कपूर आणि नवाजुद्दीन शेख यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले होते.
हर्षाली मल्होत्रा या सिनेमामुळे सुपरहिट झाली. आजही अनेकजण तिला मुन्नी या नावानेच ओळखतात. लवकरच ती सिनेविश्वात पदार्पण करणार असल्याची शक्यता आहे.
