नवी दिल्ली : भारतीय महिला संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या दरम्यान भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज निरंजना नागराजन हिने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. ती सध्या भारतीय संघाचा भाग नाही आणि तिने 2016 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
निरंजना नागराजन हिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, व्यावसायिक स्तरावर क्रिकेट खेळणे माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट या पासून सुरू झाली. क्रिकेटमुळे मला आयुष्यात पुढे जाण्याचा दृष्टीकोन आणि कारण मिळाले. जवळपास मी 24 वर्षांपासून व्यावसायिकपणे खेळत आहे. पण आता मी सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.
पुढे तिने लिहिले की, मी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळली आहे. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी माझ्या आजीचा ऋणी आहे, तिच्यामुळे मी क्रिकेट खेळू लागले. यासोबत तिने पती, पालक, बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचेही आभार मानले आहेत.
35 वर्षीय निरंजना नागराजनने भारतीय महिला संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. 2008 मध्ये तिने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2016 मध्ये श्रीलंकाविरुद्ध रांची येथे झालेल्या टी-20 सामन्यात ती भारताकडून शेवटची खेळली होती.
निरंजनाने भारतासाठी 2 कसोटी सामन्यात 27 धावा, 22 एकदिवसीय सामन्यात 70 धावा आणि 14 टी20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर कसोटीत 4 विकेट, एकदिवसीय सामन्यात 24 विकेट आणि 14 टी-20 सामन्यात 9 विकेट आहेत.
