सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा जलशुद्धीकरण केंद्राच्या आऊटलेटमधून मंगळवारी दुपारी अकरा वाजता पाणी ओव्हर फ्लो झाले. दरम्यन, दोन तास हे पाणी सुरू असल्याने हजारो लिटर पाणी वाया जाऊन वनवासवाडी येथील एका अपार्टमेंटमधील बेसमेंटमध्ये पाणी शिरले. दोन फूट पाणी शिरल्याने दुकान, मेडिकल मधील साहित्य भिजून नुकसान झाले. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट या प्रकरणी आक्रमक झालेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे यांनी दिला आहे.
वनवासवाडी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पात गेल्या कित्येक वर्षांपासून आऊट लेट पाणी वाया घालवले जात असून त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी वारंवार स्थानिकांनी केला आहे. तरीही त्यावर उपाय होताना दिसत नाही. मंगळवारी सकाळी पाणी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर वाहू लागले, रस्त्यावरून ते बाजूच्या इमारतीमधील बेसमेंटमध्ये शिरले. बेसमेंटमध्ये असलेले मेडिकल, बेकरी, कपड्यांचे दुकान, पार्लर, इस्त्रीचे दुकान यामध्ये तब्बल दोन फूट पाणी आले. त्यामुळे व्यावसायिकांचे साहित्य भिजले.
याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून नुकसानग्रस्त दुकान मालकांच्या मालाचा पंचनामा करण्यासाठी स्थानिकांनी बोलवले तरी सुद्धा कोणीही फिरकले नाही. अखेर स्थानिकांनी एक जेसीबी आणून रस्त्याच्या बाजूने चर काढून येणारे पाणी बंद केले. यावरून येत्या दोन दिवसांत दुकान मालकांना नुकसानभरपाई मिळाली नाही तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने पोवई नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा सातारा तालुका प्रमुख रमेश बोरटे यांनी दिला आहे.
