Explore

Search

April 19, 2025 10:30 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : सातारा लोकसभा निवडणूकीत  कराड पाटणचे अपयश

राजकीय वर्तुळात चर्चा सुरू

कराड : सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झाली. त्याचा निकालही जाहीर झाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर मात करीत जिल्ह्यात लोकसभेला प्रथमच ‘कमळ’ फुलवले. आता निकालानंतर मात्र कराड- पाटण तालुक्यात गावागावातील मतांचा आढावा सुरू आहे. कोणत्या गावात ‘काय घडलं, काय बिघडलं’ हे जाणलं जात आहे. निवडणुकीत कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षाही ‘कराड- पाटण’च्या हाती ‘धुपाटणं’ आलं! याचीच चर्चा आता जोरदारपणे सुरू आहे.

खरंतर सातारा लोकसभा मतदारसंघात कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातून सुमारे ५५% मतदान आहे. त्यामुळे हे ३ मतदारसंघ नेहमीच सातारचा खासदार ठरवताना महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. आज पावतो अपवाद वगळता प्रत्येक लोकसभा निवडणुकीत कोणात्या तरी प्रमुख पक्षाकडून कराड- पाटणचा उमेदवार प्रमुख लढतीत असायचा. साहजिकच स्थानिक उमेदवार म्हणून या दोन तालुक्यातील मतदारांनी त्याच्या पाठीशी राहण्याला नेहमीच पसंती दिली आहे.

यंदा मात्र विद्यमान खासदार असणाऱ्या श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याचे समोर आले. दस्तूरखुद्द थोरल्या पवारांना त्यांनी उमेदवारी बदलण्यास भाग पाडले. मग कोरेगावच्या ‘शिंदें’च्या हातात ‘तुतारी’ दिली. त्यावेळी त्यांना चांगले मताधिक्य देण्याचा,  निवडून आणण्याचा विरोध करणाऱ्या नेत्यांनी थोरल्या पवारांना शब्द दिल्याची चर्चा होती. पण निकालानंतर मतांची आकडेवारी पाहिल्यावर आपलं गणित कुठेतरी चुकले असे नेत्यांच्या लक्षात आले असेल असे म्हणायला हरकत नाही. पण या साऱ्यात ‘तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं’ या म्हणीप्रमाणे ‘कराड- पाटण’ ची खासदारकीही गेली, घटलेल्या  मतांमुळे आपला मतदारसंघातील आबही गेला, आणि कराड पाटणच्या हाती धुपाटणे आले’ अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी

सातारचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारांनी चकवा देत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सुमारे २ हजार ९०० मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे पाटणकर ‘सिंह’ काखा फुगवू लागले आहेत. पण त्यांना उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम व काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील व त्यांचे सहकारी यांची झालेली मदत त्यांनी लक्षात घ्यायला हवी. तसेच गतवेळी लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सुमारे २७ हजाराचे असणारे मताधिक्य यंदा तेवढे किंवा त्याच्या निम्मे देखील का मिळाले नाही याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर बरे होईल अशी चर्चा आहे.

बाळासाहेब पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाने नेहमीच राष्ट्रवादीच्या उमेदवारीला भरघोस मताधिक्य दिले आहे. गत निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना तब्बल५० हजार मतांची आघाडी येथून मिळाली होती. यंदा मात्र हे मताधिक्य अवघे १ हजार ७२४ वर आले आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ तर आली आहेच पण भाजपच्या नेत्यांचे ‘मनोधैर्य’ही चांगलेच वाढले आहे हेही तितकेच खरे!

कराड दक्षिणे’त भाजपला आघाडी 

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कधीही कराड दक्षिणेत विधानसभा निवडणुकीला त्यांना यश मिळवता आलेले नाही. पण येथे त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस मजबूत मानला जातो. असे असताना भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे यंदा ‘कराड दक्षिणे’त चक्क भाजपच्या कमळाने ६१६ मतांची आघाडी घेत विरोधकांना धक्का दिला आहे.

तर कदाचित चित्र वेगळे असते

श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांच्या उमेदवारीला विरोध झाला नसता, ते किंवा अन्य असा महाविकास आघाडीचा उमेदवार कराड- पाटणचाच असता, तर कदाचित आज चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. कराड पाटणचाच खासदार पुन्हा नेतृत्व करताना पाहिला मिळाला असता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच कराड पाटणची खासदारकी घालवणाऱ्यांना सुज्ञ मतदार दुषणे देत आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy