कराड : कराडवरून सातारा, पुणे, मुंबईसह पाटण, चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मलकापूरच्या तत्कालीन पादचारी पुलाजवळून यू टर्न सुरू करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. सध्या तेथील पुलाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे तेथील साताऱ्याकडे जाणारा मार्ग बंद करून तो संगम हॉटेल समोरून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मनसेचे दादा शिंगण यांनाही मागणी केली होती. तो मार्ग सुरू झाल्यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे.
कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असल्यामुळे कराडवरून सातारा, पाटण, चिपळूणला जाणाऱ्या वाहनांसाठी ढेबेवाडी फाट्यावरच्या उड्डाण पुलाखालून वाहने वळवून जावे लागत होते. दरम्यानच्या काळात कोल्हापूर नाक्यावरचा उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर वाहतूक पोलिस आणि महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून मलकापूरच्या तत्कालीन पादचारी पूल पाडल्यानंतर झालेल्या मोकळ्या जागेतून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी यू टर्न करण्यात आला.
त्या मार्गावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरळीत वाहतूक सुरू होती. त्या मार्गावरून जाताना वाहनधारकांना लांबून जावे लागत होते. त्याचा विचार करून मनसेचे दादा शिंगण यांनी कोल्हापूर नाक्यावरून यू टर्न करावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, तेथील पुलाचे कामही सुरू होणार आहे. त्यामुळे तेथील यू टर्न हटवून तो सध्या संगम हॉटेल समोरून करण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे.
त्याचा विचार करून वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, पोलिस कर्मचारी, तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी, कर्मचारी व दादा शिंगण यांनी तेथील पाहणी केली. त्यानंतर तेथे डांबरीकरण करून तो रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा, पुणे, मुंबईसह पाटण, चिपळूणला जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होणार आहे.
