सातारा : शासकीय रुग्णालयातील उपचाराबाबत नेहमीच तक्रारीचा सूर ऐकू येतो. पण, काही चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्याचे जलंत उदाहरण साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात तीस वर्षाच्या अपंग महिलेला अनुभवण्यास मिळालेले आहे. या महिलेच्या पोटाच्या गाठीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाबद्दलचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय या ठिकाणी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामध्ये गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, हमाल व हातावर पोट असणारे तसेच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक सुद्धा उपचारासाठी या रुग्णालयात दाखल होतात. अशाच पद्धतीने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील श्रीमती जयश्री खंडू निंबाळकर वय -तीस वर्षे या अपंग महिला पोटातील बोव्हेरियन सिष्ट या प्रकारच्या गाठीच्या मुळे त्रस्त झाल्या होत्या. अनेकदा पोटामध्ये वेदना होत असल्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत होता. अनेक वेदनाशामक गोळ्या व गावठी औषध घेऊन सुद्धा त्यामध्ये फारसा फरक पडत नव्हता. अखेर त्यांनी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
प्रारंभी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोटातील गाठी बाहेर काढून त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे. हे गरजेचे असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय पथकाने काढला. त्यानुसार त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करून ही गाठ बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरची महिला अपंग असल्यामुळे व कमरेखालील भाग हा लुळा पडल्याने या महिलेची अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ. एस. पी. देसाई व सहकारी वैद्यकीय डॉक्टर यांनी अत्यंत काळजीपूर्वक पोटावरील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली.
यासाठी वर्ग एक स्त्री रोग तज्ञ डॉ. सुनील सोनवणे व डॉ. इनामदार आणि भूलतज्ञ डॉ. सौरभ मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. काही तासाच्या कालावधीमध्ये सातारा शासकीय रुग्णालयातच ही पोटावरील अवघड शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सदर महिलेच्या पोटातील वेदना कायमच्याच नष्ट होणार आहेत. आता पोटाच्या विकाराच्या कोणत्याही तक्रारी शिल्लक राहणार नसल्यामुळे श्रीमती निंबाळकर यांच्या चेहऱ्यावरही समाधान पसरले.
सातारा येथील शासकीय रुग्णालयात डॉ. युवराज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा लाभत आहे. दररोज किमान सुमारे ४०० रुग्णांची तपासणी व औषध उपचार होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत आहेत. शासकीय रुग्णालयातील उपचार हे निशुल्क व काही आजारासाठी अत्यंत कमी शुल्क मध्ये होत असल्याने गोरगरिबांची जगण्याची इच्छा प्रबळ झालेली आहे. सदरची शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करायची म्हटली तर लाख ते दीड लाख रुपये खर्च घेतल्याशिवाय शस्त्रक्रिया पूर्ण होत नाही. पण, शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्णांसाठी आता शासकीय रुग्णालय खऱ्या अर्थाने संजीवनी ठरलेली आहे. त्याचा लाभ सर्वांनीच घ्यावा. असे सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय सेवेसाठी तत्पर असलेले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांनी सुद्धा या कामगिरीबद्दल वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत.
