नवी दिल्ली : भारत विरुद्ध झिम्बाब्वे पाच सामन्यांची टी20 मालिका आहे. ही मालिका 6 जुलैपासून सुरु होणार आहे. 14 जुलैपर्यंत ही पाच सामन्यांची मालिका असणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यांसाठी आता काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना पहिल्या दोन टी20 मालिकेसाठी संघात घेतलं आहे. या तिघांना संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या बदल्यात घेतल आहे. हे तिघंही टी20 वर्ल्डकप संघातील खेळाडू असून त्यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी आराम देण्यात आला आहे. भारतीय संघ अजूनही बारबाडोसमधून भारतात परतला नाही. तिथल्या वादळी स्थितीमुळे विमानतळ बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे या तिघांना मायदेशी परतल्यानंतर हवा तसा आराम मिळणार नाही. याचाच विचार करून बीसीसीआयने या तिघांच्या जागी पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध पहिला सामना 6 जुलै आणि दुसरा सामना 7 जुलैला होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना 10 जुलैला होणार आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हरारे येथे पोहोचतील असं बीसीसीआयने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी -20 सामन्यासाठी भारताचा संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे, साई सुधारसन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा
