नाशिक : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने ) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका, असे पत्रकार छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर उपरोधिक टीका केली आहे.
नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांच्या वतीने पत्रक छापण्यात आले आहेत. त्यात महिलांना योजनेची माहिती देणाऱ्या पत्रकावर मजकूर छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. आमच्या प्रभागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवून देत सरकारवर टीका करणार, अशी भूमिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले आहे.
1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका
ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे म्हणाले की, या सरकारचे आयुष्य केवळ दोन-तीन महिन्याचे राहिले आहे. जर गरीब महिलांना 1500 रुपये मिळत असतील, तर त्यांना 1500 रुपयांपासून वंचित का ठेवायचे? सरकारने सर्वसामान्य जनतेचा पैसा लुटला आहे आणि तोच पैसा वेगळ्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचवतील. हे सरकार गद्दारी करून जन्माला आले आहे. त्यामुळे राज्यात या सरकारची बदनामी झाली आहे. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला धूळ चारली. विधानसभेत देखील हे सरकार पायउतार होणार असल्याची जाणीव झाल्यामुळे 1500 रुपये देतो, पण आम्हाला गद्दार म्हणू नका, अशी त्यांनी योजना काढली आहे. आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महिलांना 1500 रुपये मिळवून देणार आहोत, तसेच सरकारचा धिक्कार करून आम्ही आंदोलन करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. बाळा दराडे यांच्या आंदोलनाची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
