बायकोच्या अभिनयाचं केले कौतुक
मुंबई : ‘कल्की 2898 एडी’ ( Kalki 2898 AD) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडत पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. या सिनेमात प्रत्येकाने त्याची भूमिका वठवण्याचा प्रयत्न केलाय. यावर अनेक कलाकार देखील प्रतिक्रिया देत असून या सिनेमाचं कौतुक केलं जातंय. अभिनेता रणवीर सिंहने देखील बायकोच्या या सिनेमाचं कौतुक केलंय.
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कल्कीचं पोस्टर शेअर करत सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसेच त्याने अमिताभ यांच्यासाठी हा सिनेमा पाहावा असं आवाहन देखील केलंय. दीपिकाने तिची प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर हे जोडपं बरंच चर्चेत आलं आहे. त्यातच आता दीपिकाच्या या सिनेमामुळेही पुन्हा एकदा ती चर्चेत आली. यावर पोस्ट करत रणवीरने त्याच्या बायकोच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
रणवीरने काय म्हटलं?
रणवीर सिंहने त्याच्या पोस्टमध्ये नाग अश्विन यांचं अभिनंदन करुन त्यांच्या सिनेमाचं कौतुक केलंय. तसेच त्याने प्रभास, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. माझ्यासारखे तु्म्हीही अमिताभ यांचे फॅन असाल तर हा सिनेमा नक्की पाहा. दीपिकाविषयी बोलताना रणवीरने म्हटलं की, सिनेमातल्या प्रत्येक क्षणात तुझी मार्मिकता, काव्यमयता आणि शक्ती पाहायला मिळतेय. तु तुलनेच्याही पलिकडे आहेस, आय लव्ह यू…!
‘कल्की 2898 एडी‘ने या चित्रपटांचे तोडले विक्रम
‘कल्की 2898 एडी’ बॉक्स ऑफिसवर दररोज विक्रम रचत आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यापैकी या चित्रपटाने केवळ चार दिवसांतच हिंदी व्हर्जनमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
‘कल्की 2898 एडी’ने या वर्षी रिलीज झालेले ‘मुंज्या’ ‘क्रू’, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ आणि ‘आर्टिकल 370’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईपेक्षा अधिक कमाई केली आहे. चार दिवसांत ‘कल्की 2898 एडी’ची हिंदी भाषेतील कमाई 110.5 कोटी रुपये आहे. ‘मुंज्या’ची 24 दिवसांची एकूण कमाई 95 कोटींच्या आसपास आहे.’क्रू’ने बॉक्स ऑफिसवर 90 कोटी, तेरी बातो में उलझा जिया या चित्रपटाने 87 कोटी आणि आर्टिकल 370 ने 84 कोटींची कमाई केली आहे.
